नाशिक शहर परिसरात २८ जूनपासून हरित कुंभ- हरित मॉन्सून उपक्रम

नाशिक। दि. २३ जून २०२६: ‘उन्नत नाशिक अभियान’ आणि नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि परिसरात ‘हरित कुंभ- हरित मॉन्सून उपक्रम २८ जून ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत एक लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आगामी कुंभमेळा हरित, स्वच्छ, पर्यावरणपूरक असा राहील, असे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक शहर आल्हाददायी वातावरणासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. नाशिक शहराची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख निर्माण होण्याच्या उद्देशाने ‘स्वच्छ, हरित व सुंदर नाशिक’ या संकल्पनेवर आधारित ‘उन्नत नाशिक अभियान’ ही व्यापक स्वरूपाची आणि लोकसहभाग असलेली लोकचळवळ राबविण्यास महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच एक मेपासून सुरुवात झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नऊ हजार रुपयांच्या उसनवारीच्या वादातून युवकाची हत्या; आरोपीला १२ तासांत अटक

या अभियानांतर्गत नाशिक शहर व परिसरात ‘हरित कुंभ- हरित मॉन्सून’ या उपक्रमाच्या माध्यमातून एक लाख वृक्ष लागवडीचा निर्धार करण्यात आला आहे. याबरोबरच स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि हरित उपक्रमावर भर देण्यात आला आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून महानगरपालिका क्षेत्रात १७ मे रोजी चार हजारांपेक्षा अधिक देशी जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे, तर जागतिक पर्यावरण दिनी म्हणजेच पाच जून रोजी शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदी स्वच्छतेसाठी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.

या अभियानात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. त्यासाठी पद्मश्री राहिबाई पोपेरे यांची मदत घेतली जात आहे. नाशिक शहर परिसरात पर्यावरण पूरक उपक्रम राबवून नाशिक शहराला ‘हरित शहर’ बनविण्यासाठी व्यापक आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यातून नाशिक शहराला राष्ट्रीय सर्वेक्षणांमध्ये उच्च स्थान मिळवून देणे आणि पर्यावरण, स्वच्छता व वायू गुणवत्तेमध्ये संतुलित प्रगती साधणे हा आहे.

🔎 हे वाचलं का?:  नांदूरमध्यमेश्वर येथे २८ जून ला 'पावसाळापूर्व पक्षी गणना' होणार

एक लाख वृक्ष लागवडीसाठी लोकसहभागाबरोबरच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सर्व शासकीय, निमशासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक व पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत संघटना, विविध आस्थापनांची मदत घेतली जाणार आहे.

वृक्ष लागवड अभियानास २८ जूनपासून प्रारंभ होईल. एकूण १८ रविवार हा उपक्रम राबविण्यात येईल. यामध्ये बियांचे सीड बॉल तयार करून त्यांचे रोपण करण्यात येईल. यासह कुसुमाडी पॅटर्नच्या माध्यमातून वृक्ष लागवड करणे देखील अपेक्षित आहे. या माध्यमातून मोकळ्या जागेत वृक्ष लागवडीला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण, महानगरपालिका, विविध शासकीय, निमशासकीय विभाग, सामाजिक संस्था, निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत संस्था, व्यक्ती, माध्यम समूह प्रतिनिधींची मॉन्सून वृक्ष लागवड समिती गठित करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सहा तासांत २० मिमी पावसाची नोंद; पुढील चार दिवस पावसाचा अलर्ट !

या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे अध्यक्षस्थानी होते. उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, कुंभमेळा मंत्री श्री. महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव आदी उपस्थित होते. वृक्ष लागवडीच्या उपक्रमात प्रत्येक नागरिकाने आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790