नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’; उद्या (दि. २३) विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाची शक्यता

नाशिक। दि. २२ जून २०२६: दीर्घ प्रतीक्षेनंतर नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने मंगळवार (दि. २३) रोजी नाशिक शहरासह जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याबरोबरच विजांच्या कडकडाटासह पावसाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रस्ता की मृत्यूचा सापळा? सातपूर-अंबड लिंकरोडवर चिखलामुळे दुचाकी घसरली, एकाचा मृत्यू

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी ३४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेला पारा आता पुन्हा ३६ अंशांच्या पुढे गेला आहे. रविवारी सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमान ३६.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्यामुळे उकाडा आणि उष्णतेची तीव्रता नागरिकांना जाणवू लागली आहे.

दरम्यान, मान्सूनच्या प्रगतीला वेग मिळत असल्याने शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी ही सकारात्मक बाब मानली जात आहे. जिल्ह्यातील अनेक जलसाठ्यांची पातळी खालावली असून पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. त्यातच पावसाअभावी खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत मंगळवारी (दि. २५) वीजपुरवठा बंद राहणार !

हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदा प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’ परिस्थितीचा परिणाम पर्जन्यमानावर होण्याची शक्यता आहे. या हवामान घटनेमुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीस काही प्रमाणात अडथळे निर्माण झाले होते. परिणामी राज्यभर मान्सूनचा विस्तार अपेक्षेपेक्षा उशिरा होत असून जून महिन्याच्या अखेरीस तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' विविध भागांतील वाहतूक मार्गात आज (दि. २६) महत्वाचे बदल

मात्र, मंगळवारपासून राज्यासह नाशिक जिल्ह्यातही मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरसह घाटमाथ्याच्या भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत असून, आगामी काळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790