नाशिकमध्ये १६ लाखांचा एमडी ड्रग्ज साठा जप्त; तिघांना अटक !

नाशिक। दि.२० जून २०२६: शहर पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल ३२०.३५ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ आणि इतर मुद्देमालासह एकूण १८ लाख ३५ हजार ५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी राजस्थानातील दोन संशयितांसह तिघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थविरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की राजस्थान येथील काही व्यक्ती मोठ्या प्रमाणात एमडी (मेफेड्रोन) विक्रीसाठी नाशिक रोड परिसरात येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थविरोधी पथक आणि गुंडाविरोधी पथकाने उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील प्रधाननगर परिसरातील स्वानंद महिला सांस्कृतिक मंडळ हॉल परिसरात सापळा रचला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विधान परिषद निवडणूक २०२६: स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात दुपारी 12 वाजेपर्यंत 9.85 टक्के मतदान

यावेळी एमएच १५ बीबी ६६४७ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन संशयितांना अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून २०० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत १० लाख ७० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज (दि. २०) स्वर ‘स्वर-सावाना’चे २३ वे पुष्प

या कारवाईत पुनाराम हिराराम बिश्नोई (वय ३६, रा. जोधपूर, राजस्थान) आणि श्रवणकुमार लाखाराम बिश्नोई (वय २९, रा. जोधपूर, राजस्थान) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माधव लॉन्स परिसरातील एका घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत सुरेश पुनाराम गोडारा (वय २७, रा. नाशिक रोड) याच्या ताब्यातून १२०.३५ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ, तसेच अन्य मुद्देमाल असा एकूण ६ लाख ९५ हजार ५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी जिल्ह्यात 99.84 टक्के मतदान- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

दोन्ही कारवायांमध्ये मिळून ३२०.३५ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) आणि इतर मुद्देमाल असा एकूण १८ लाख ३५ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संबंधित तिन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून या अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790