नाशिक। दि. १८ जून २०२६: महानगरपालिकेकडून शहरातील प्रमुख भागांमध्ये शुक्रवार (दि. १९) पासून व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेची सुरुवात फाळके रोड, दूध बाजार आणि भद्रकाली परिसरातून करण्यात येणार असून, कारवाईसाठी आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला आहे.
अतिक्रमण निर्मूलन विभागाने संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केली असून, भद्रकाली परिसरातील २२ आस्थापना व दुकानदारांना अंतिम नोटिसा देण्यात आल्या आहेत. यापूर्वी सारडा सर्कल परिसरात अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या व्यावसायिक भागांकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.
फाळके रोड, दूध बाजार आणि भद्रकाली परिसरात होणाऱ्या कारवाईमुळे व्यापारी व व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेच्या कारवाईदरम्यान मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी अनेक व्यावसायिकांनी स्वखर्चाने आपली अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली आहे.
कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली होती. त्यास प्रशासनाने हिरवा कंदील दिला आहे.
शहरातील नियमबाह्य अतिक्रमणांविरोधात ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असून, संबंधितांना पूर्वसूचना देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अतिक्रमणांवर कोणतीही सवलत न देता कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी दिली.
![]()


