मान्सून लांबला? नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद

नाशिक। दि. १२ जून २०२६: मान्सूनच्या आगमनाला पुन्हा विलंब होत असल्याने नाशिक जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचित जास्त असला तरी तो सातत्याने घटत असून सध्या केवळ २५.३१ टक्क्यांवर आला आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून प्रशासनाकडून १८० टँकरच्या माध्यमातून ६५५ गावे व वाड्यांमधील ३ लाख १९ हजार ४४ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ई-कार डीलरशिपच्या आमिषाने व्यावसायिकाची १४.०७ लाखांची फसवणूक

जिल्ह्यातील सात मोठे आणि १९ मध्यम अशा एकूण २६ प्रकल्पांमध्ये मिळून १७ हजार ८७१ दशलक्ष घनफूट इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. वाढत्या तापमानामुळे धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून अनेक मध्यम व लघु प्रकल्पांतील साठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. वाघाड, भोजापूर, भाम, पुणेगाव, पुनद आणि तिसगाव धरणांतील पाणीसाठा लक्षणीयरीत्या घटल्याचे चित्र आहे.

हवामान विभागाने १५ जूननंतर मान्सून राज्यभर सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामाबाबत अनिश्चितता कायम असून प्रशासनाने शेतकऱ्यांना केवळ अवकाळी किंवा वादळी पावसाच्या आधारे पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका येवला तालुक्याला बसला असून येथे ४४ गावे आणि ७० वाड्यांसाठी ४४ टँकर कार्यरत आहेत. त्यानंतर नांदगावमध्ये ३६, इगतपुरीत २१, सिन्नरमध्ये १८ आणि मालेगावमध्ये १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी जून महिन्यात जिल्ह्यात १४८ टँकर कार्यरत होते, तर यंदा ही संख्या वाढून १८० वर पोहोचली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एटीएम कार्ड बदलून ६७ हजारांची फसवणूक; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

प्रमुख धरणांतील पाणीसाठा
गंगापूर धरण:
३५.०६ टक्के
कश्यपी धरण: ४०.६६ टक्के
गौतमी गोदावरी धरण: ७५.४३ टक्के
आळंदी धरण: ५.८८ टक्के
गंगापूर समूह (एकूण): ४१.१६ टक्के
पालखेड समूह: १९.३९ टक्के
दारणा समूह: २० टक्के
गिरणा खोरे: ३०.८१ टक्के

मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यात जलसाठा झपाट्याने कमी होत असल्याने आगामी काही दिवस पाणी व्यवस्थापनाचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790