नाशिक जिल्ह्यातून निर्यात वृद्धीसाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नाशिक। दि. ११ जून २०२६: जिल्ह्यातून कृषी उत्पादनासह औद्योगिक उत्पादनांच्या निर्यातीला मोठी संधी उपलब्ध आहे. ही संधी साधण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

जिल्हा निर्यात प्रोत्साहन समिती (DEPC) बैठक व डिस्ट्रिक्ट ऍज ऍन एक्सपोर्ट हब (District as an Export Hub) उपक्रमांतर्गत निर्यात प्रोत्साहन मिशन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त महासंचालक, परराष्ट्र व्यापार (DGFT) पुणे आर. के. मिश्रा, उपमहासंचालक (DGFT) अश्विन घोलपकर, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र चेतन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, निर्यात प्रोत्साहन संस्था, उद्योग संघटना व जिल्ह्यातील प्रमुख निर्यातदार उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

बैठकीत नाशिक जिल्ह्याचा सन २०२५-२६ मधील निर्यात परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच जिल्ह्याच्या निर्यात वृद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या धोरणात्मक कृती आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी EY मुंबईचे सल्लागार सूरज जाधव यांनी जिल्हा निर्यात कृती आराखडा (DEAP) सादर केला.

अतिरिक्त महासंचालक श्री. मिश्रा यांनी विविध निर्यात प्रोत्साहन योजनांची माहिती देत ट्रेड कनेक्ट पोर्टल (Trade Connect Portal) व इतर डिजिटल सुविधांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले. तसेच जिल्ह्यातील निर्यात वाढीस चालना देण्यासाठी खरेदीदार-विक्रेता मेळावा (Buyer-Seller Meet) व ई-कॉमर्स निर्यात मेळावा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

बैठकीदरम्यान अपेडा, एक्झिम बँक, सिडबी, नाबार्ड (APEDA, EXIM Bank, CGTMSE, SIDBI, NABARD, PLEXCONCIL, DHL Express) यांच्यासह विविध उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींनी निर्यातवाढीसाठी उपलब्ध योजनांची माहिती दिली. निर्यातदारांनी हवाई मालवाहतूक खर्च, अनुदानाची आवश्यकता, परदेशी वाणिज्य दूतावासांशी संवाद तसेच जागतिक घडामोडींमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत मुद्दे मांडले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी जिल्ह्यामध्ये कृषी, वाईन, अभियांत्रिकी व सेवा क्षेत्रांमध्ये मोठी निर्यात क्षमता असून सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून जिल्ह्याची निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यस्थापक श्री. पाटील यांनी आभार मानले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790