नाशिक: किरकोळ विक्री करणाऱ्या पेट्रोल पंप चालकांनी घाऊक विक्री करू नये- पेट्रोल पंप चालकांना निर्देश

नाशिक। दि. ६ जून २०२६: घाऊक ग्राहक किरकोळ विक्री केंद्रावरून पेट्रोलियम पदार्थ खरेदी करीत असल्याचे आढळल्यास संबंधित घाऊक ग्राहक व किरकोळ विक्री केंद्र चालकावर जीवनावश्यक वस्तू अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी पेट्रोलपंप चालकांसमवेत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांच्यासह पेट्रोल पंप चालक उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, सद्य:स्थितीत राज्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधनाचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरावर आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. घाऊक व औद्योगिक ग्राहकांकडून किरकोळ विक्री केंद्रांवरून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे किरकोळ ग्राहकांसाठी उपलब्ध इंधन साठ्यावर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पेट्रोलियम उत्पादनांची साठेबाजी, काळाबाजार, अनधिकृत विक्री, वाहतूक अथवा भेसळ यांसारख्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांच्या दैनंदिन विक्रीची माहिती संकलित करून असामान्य वाढ किंवा घट आढळल्यास तत्काळ तपासणी करण्यात येईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

मोठ्या प्रमाणावर पेट्रोल किंवा डिझेलची आवश्यकता असलेल्या व्यावसायिक व औद्योगिक संस्थांनी थेट तेल विपणन कंपन्यांच्या घाऊक पुरवठा यंत्रणेमार्फत इंधन खरेदी करावी. अशा संस्थांना किरकोळ विक्री केंद्रांमधून इंधन पुरवठा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कृषी कामे, रुग्णालये तसेच अत्यावश्यक सेवांसाठी डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवण्यास प्राधान्य द्यावे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

जिल्हा प्रशासन, तेल विपणन कंपन्या आणि पेट्रोल पंप चालक यांनी परस्पर समन्वय ठेवून इंधनाचा अखंड पुरवठा सुनिश्चित करावा. तसेच पेट्रोल पंपांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रशासकीय व पोलीस यंत्रणेचे सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले.

नागरिकांनीही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच घाबरून जाऊन इंधनाची अतिरिक्त खरेदी अथवा साठवणूक करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी यावेळी केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790