नाशिक: सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या घरफोडीचा गुन्हा अखेर उघड; ६.५० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

नाशिक, दि. ५ जून २०२६: गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने आनंदवली-चांदशी पुल परिसरात कारवाई करत घरफोडीतील चोरीचे सोन्याचे दागिने बाळगणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ६ लाख ५० हजार रुपये किमतीचे ४१.७७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, या चौकशीतून साडेतीन वर्षांपूर्वीचा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

गुन्हे शाखा युनिट-१चे हवालदार प्रशांत मरकड आणि मिलींदसिंग परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत आनंदवली-चांदशी पुलाजवळ चोरीचे सोने घेऊन एक व्यक्ती फिरत असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.

🔎 हे वाचलं का?:  केरळमध्ये नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन, देशभरातील प्रतीक्षा संपली !

त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित परिसरात सापळा रचला. दरम्यान, आनंदवली रोडवरून पुलाच्या दिशेने पायी येणारी एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसून आली. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पथकाने त्याला शिताफीने पकडले.

चौकशीत त्याने आपले नाव किशोर शालीक भालेराव (वय २२, रा. बजरंगनगर, जोशीवाडा, आनंदवली, गंगापूर रोड, नाशिक) असे सांगितले. त्याच्या अंगझडतीत ३०.०१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नक्षीदार मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि लक्ष्मीची प्रतिमा असलेले सोन्याचे नाणे असा एकूण ४१.७७ ग्रॅम वजनाचा व ६.५० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: वकिलावरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील मुख्य फरार आरोपी जेरबंद

अधिक चौकशीदरम्यान भालेराव याने आपल्या त्याचे मित्र संशयित रोहित लोटे, विकास रामदास मैश उर्फ म्हशा यांनी सावरकरनगर, गंगापूर रोड येथील एका बंगल्यात सुमारे तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. चोरीतील वाट्याला आलेले दागिने त्याने स्वतःकडे ठेवले होते आणि विक्रीच्या उद्देशाने ते जवळ बाळगल्याचे त्याने सांगितले.

या माहितीनुसार तपास केल्यानंतर २८ नोव्हेंबर २०२२ रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 'वन प्लॅटफॉर्म' यंत्रणा; गर्दी, वाहतूक अन् सुरक्षेचे होणार 'रिअल टाइम' व्यवस्थापन

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटकेयांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रमेश शिंदे, सुदाम सांगळे, किरण शिरसाठ, हवालदार प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, मिलींदसिंग परदेशी, संदिप भांड, विशाल काठे, नाझीमखान पठाण, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, रमेश कोळी, उत्तम पवार, धनंजय शिंदे, राजेश लोखंडे, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, मुक्तार शेख, गोरक्ष साबळे, शर्मिला कोकणी, मनिषा सरोदे, अनुजा येलवे यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790