नाशिक: स्टॉक मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली ६० लाखांची फसवणूक; दोघे रायगडमधून जेरबंद

नाशिक। दि. २९ मे २०२६: शेअर बाजारातील गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सुमारे ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन संशयितांना गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने रायगड जिल्ह्यातून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत फिर्यादी व त्यांच्या मित्रांना ‘फ्युचर स्टॉक मार्केट अॅनालिसिस’ नावाची गुंतवणूक संस्था असल्याचे भासविण्यात आले. यश जानवलकर आणि युवराज जानवलकर यांनी फिर्यादी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना आपल्या संस्थेमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यांच्याकडून सुमारे ६० लाख रुपये स्वीकारल्यानंतर कोणताही आर्थिक परतावा न देता त्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात १८ मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला होता. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित रायगड जिल्ह्यात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक रायगडकडे रवाना करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

सहायक पोलिस निरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी आणि सुनील खैरनार यांच्या पथकाने खोपोली व नेरूळ परिसरात शोधमोहीम राबवून युवराज सुरेश जानवलकर (वय ३२) आणि यश सुरेश जानवलकर (वय ३०) यांना ताब्यात घेतले. दोघेही मूळचे खोडेमळा, सिडको येथील रहिवासी असून सध्या शेलू-नेरूळ (ता. कर्जत, जि. रायगड) येथे वास्तव्यास होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

दोन्ही संशयितांना पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या फसवणुकीत आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे. सदरची कामगिरी गुन्हेशाखा युनिट २ चे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर (प्रभारी अधिकारी), सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, सुनिल खैरनार यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790