नाशिक: सिंहस्थ कामांवर पावसाळ्यापूर्वी सुरक्षा उपाय बंधनकारक; ३१ मेपर्यंत सर्व उपाययोजना पूर्ण करण्याचे आदेश

नाशिक। दि. २७ मे २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सर्व विकासकामांमध्ये पावसाळ्यापूर्वी आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने दिले आहेत. प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी यासंदर्भातील सविस्तर परिपत्रक ८ मे ला जारी केले असून, सर्व विभाग, कंत्राटदार आणि कार्यान्वयन यंत्रणांना ३१ मे २०२६पर्यंत कामे पूर्ण करून अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीअंतर्गत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणावर रस्ते, ड्रेनेज, घाट, पाणीपुरवठा आणि विविध नागरी सुविधा विकासाची कामे सुरू आहेत. पावसाळ्यात नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी हे निर्देश अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

परिपत्रकानुसार सर्व बांधकाम साहित्य, माती, स्क्रॅप व ढिगारे तातडीने हटविणे किंवा सुरक्षितरीत्या साठवणे आवश्यक राहणार आहे. खोदकाम किंवा सखल भागांमधील यंत्रसामग्री व साहित्य स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कामांच्या परिसरातील नाले, पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्या आणि क्रॉस ड्रेनेज व्यवस्था तातडीने स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रस्त्यांवर किंवा वाहतुकीच्या मार्गांवर मुरूम, माती किंवा साहित्य राहणार नाही, याची खात्री करण्यास सांगितले आहे.

खोदकाम व ट्रेंचिंग करण्यात आलेल्या भागांभोवती मजबूत बॅरिकेडिंग, रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह टेप्स, साइनबोर्ड आणि आवश्यक प्रकाशयोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पूरप्रवण भागांमध्ये उच्च क्षमतेचे डी-वॉटरिंग पंप पूर्वतयारीत ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

प्रत्येक कंत्राटदार आणि कार्यान्वयन यंत्रणेला पूरस्थिती समन्वयासाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच बीटी साहित्य, पेव्हर ब्लॉक्स आणि दुरुस्ती साहित्यांसह आपत्कालीन प्रतिसाद वाहन सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व विद्युत यंत्रणा व वायरिंग पाण्यापासून सुरक्षित ठेवणे, तसेच नाल्यांलगत वाढलेली झाडाझुडपे हटवून पाणी साचणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

मैदानी अधिकाऱ्यांना नियमित पाहणी करून स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि आपत्कालीन सेवांशी सातत्याने समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या संदर्भात नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी वेगाने सुरू आहे. मात्र विकासकामांच्या ठिकाणी पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यालाही आम्ही तितकेच प्राधान्य देत आहोत. प्रत्येक यंत्रणेसाठी हे सुरक्षा निकष बंधनकारक असतील. नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था कोणत्याही परिस्थितीत बाधित होता कामा नये.”

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

ठळक निर्देश:
👉 ३१ मे २०२६पर्यंत सर्व प्रकल्पस्थळी पावसाळ्यापूर्वीच्या सुरक्षा उपाययोजना पूर्ण करणे बंधनकारक
👉 खोदकाम व ट्रेंचिंग भागांभोवती बॅरिकेडिंग, रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह टेप्स, साइनबोर्ड व प्रकाशयोजना करणे आवश्यक
👉 रस्ते, दुभाजक आणि नाल्यांमधील माती, बांधकाम साहित्य व कचरा हटविण्याचे आदेश
👉 पूरप्रवण भागांमध्ये उच्च क्षमतेचे डी-वॉटरिंग पंप सज्ज ठेवणे बंधनकारक
👉 सर्व विद्युत यंत्रणा व वायरिंग वॉटरप्रूफ करून सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
👉 प्रत्येक कंत्राटदाराने आपत्कालीन प्रतिसाद वाहन आणि पर्यवेक्षक नियुक्त ठेवणे आवश्यक
👉 पूरस्थिती समन्वयासाठी प्रत्येक यंत्रणेकडून नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती अनिवार्य
👉 छायाचित्रांसह अनुपालन अहवाल ३१ मेपूर्वी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडे सादर करणे बंधनकारक

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790