नाशिक। दि. २७ मे २०२६: इंदिरानगर पोलिस ठाण्यात २०२१ मध्ये दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीवर १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
या प्रकरणातील आरोपी त्र्यंबक शंकर गवळी (वय ७०, रा. मोहोळेवाडी, गंगापूर रोड) याच्याविरोधात न्यायालयाने हा निकाल दिला. जिल्हा व सत्र न्यायालय, कोर्ट क्रमांक ८ येथील न्यायाधीश के. के. पाटील यांनी हा निर्णय सुनावला.
सरकारी पक्षाच्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर २०२१ रोजी इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. फिर्यादी महिला आरोपीच्या मालकीच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होत्या. त्यांची अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर आरोपीने तिला आपल्या घरी बोलावून दूरदर्शन सुरू करून देण्यास सांगितले. मुलगी घरात गेल्यानंतर आरोपीने दरवाजा बंद करून तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप होता.
मुलीने आरडाओरडा केल्यानंतर ती आरोपीच्या तावडीतून सुटून बाहेर आली. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एन. ए. सय्यद यांनी केला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुलभा सांगळे यांनी कामकाज पाहिले. तसेच प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी प्रदीप गायकर, दिनकर खैरनार आणि संगीता पाटील यांनी सहकार्य केले.
![]()

