सिंहस्थ २०२७ साठी दिशा दर्शक फलकांचे नियोजन सुरू; ऑलिम्पिक तज्ज्ञाचा सहभाग

नाशिक। दि. १९ मे २०२६: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांना नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सहज, सुलभ आणि विनाअडथळा मार्गदर्शन मिळावे यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने वैज्ञानिक पद्धतीच्या साईनेज आणि वे-फाइंडिंग प्रणालीच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. यासंदर्भातील उच्चस्तरीय बैठक सोमवारी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे पार पडली.

या बैठकीस नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, नाशिक शहर पोलिस उपायुक्त किरण चव्हाण, नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, एएसआय (राज्य) सहायक संचालक अमोल गोटे, शिर्डी नगर परिषद मुख्याधिकारी सतीश दिघे, ग्राफिक्स बियाँड सह-संस्थापक बारिश दाते, आंतरराष्ट्रीय वे-फाइंडिंग तज्ज्ञ मार्क रॉस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, कुंभमेळा प्राधिकरण मुख्याधिकारी अमोल चौधरी तसेच जलसंपदा विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

ऑस्ट्रेलियातील ‘डॉटडॅश’ या वे-फाइंडिंग आणि व्हिज्युअल कम्युनिकेशन क्षेत्रातील संस्थेचे सहसंस्थापक असलेले मार्क रॉस यांनी सिडनी ऑलिम्पिकसह विविध ऑलिम्पिक स्पर्धांसाठी साईनेज आणि नेव्हिगेशन प्रणालीवर काम केले आहे. याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि शहरी वाहतूक व्यवस्थांमध्येही सल्लागार म्हणून काम केले असून मोठ्या प्रमाणातील गर्दी व्यवस्थापनासाठीच्या वे-फाइंडिंग प्रणालीतील त्यांचे काम जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मानले जाते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

बैठकीत २०१५ मधील नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात वापरण्यात आलेल्या साईनेज प्रणालीचा तसेच अलीकडील प्रयागराज महाकुंभ आणि इतर मोठ्या धार्मिक व आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांतील दिशादर्शक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. सिंहस्थ २०२७ दरम्यान गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीची साईनेज प्रणाली विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “भाविकांना कोणालाही विचारावे लागू नये, इतकी स्पष्ट आणि सहज समजणारी दिशादर्शक व्यवस्था असावी. संपूर्ण वे-फाइंडिंग प्रणाली ही सोपी, बहुभाषिक आणि प्रथमच येणाऱ्या भाविकांनाही सहज समजेल अशी असणे आवश्यक आहे.”

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

बैठकीत नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, पोलिस विभाग, महानगरपालिका, अभियांत्रिकी विभाग आणि तांत्रिक तज्ज्ञांनी स्थायी , अस्थायी बहुभाषिक फलक, प्रमाणित डिझाइन, वाहतुकीचा प्रवाह, पार्किंग, घाट, मंदिरे आणि सार्वजनिक सुविधांशी सुसंगत दिशादर्शक प्रणाली यावर चर्चा केली. मोठ्या प्रमाणावरील कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वे-फाइंडिंग प्रणालींचाही अभ्यास करण्यात आला.

येत्या आठवड्यात नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, पोलिस विभाग, महानगरपालिका, अभियांत्रिकी विभाग आणि तांत्रिक पथकांच्या संयुक्त पाहणी दौऱ्यांचे आयोजन नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात करण्यात येणार असून महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करून दिशादर्शक व्यवस्थेचा आराखडा अंतिम करण्यात येणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790