नाशिक : हिरावाडीतील सराफा दुकानावर सशस्त्र दरोडा; प्रतिकार करणारा कर्मचारी जखमी… Video

नाशिक, दि. १६ मे २०२६ : हिरावाडी रोड परिसरातील विधातेनगरजवळ असलेल्या एका सराफा दुकानावर शुक्रवारी (दि. १५) रात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. दोन दुचाकींवरून आलेल्या पाच ते सहा दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत सोने-चांदीचे दागिने लुटले. दरोडेखोरांना प्रतिकार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर बंदुकीच्या दस्त्याने हल्ला करण्यात आला असून तो गंभीर जखमी झाला आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरावाडी रोडवरील चंद्रभागा अपार्टमेंटमधील गाळा क्रमांक ३ मध्ये नयना पगारिया यांचे ‘न्यू समृद्धी ज्वेलर्स’ हे दुकान आहे. शुक्रवारी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास दुकान बंद करण्याची तयारी सुरू असताना दोन दुचाकींवरून सहा जण तेथे आले. त्यापैकी दोघे बाहेर थांबले, तर मास्क व टोपी घातलेल्या चौघांनी दुकानात प्रवेश केला.

दुकानात घुसताच दरोडेखोरांनी पगारिया यांच्यावर बंदूक रोखून दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी पगारिया यांनी हातातील ट्रे फेकून प्रतिकार केला. कर्मचारी सोनाली पाटील व अमित श्रीश्रीमाळ यांनीही दरोडेखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला. झटापटीदरम्यान एका दरोडेखोराने बंदुकीच्या उलट्या बाजूने अमित यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले. जखमी अवस्थेतही त्यांनी एका दरोडेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र झटापटीत त्यांचा शर्ट फाटला आणि आरडाओरडा सुरू होताच दरोडेखोर घटनास्थळावरून दुचाकींवरून पसार झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

या हल्ल्यात अमित श्रीश्रीमाळ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना १४ टाके पडल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, दरोडेखोरांनी दुकानातून सोन्याचे पदक, लहान मुलांची अंगठी तसेच इतर दागिने लुटून नेल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संशयितांनी स्पर्श केलेल्या वस्तूंवरील ठसे आणि अन्य पुरावे गोळा करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

घटनेनंतर पोलिसांनी दुकान व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. संशयितांचा माग काढण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून शहरातील प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली होती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790