नाशिक। दि. १५ मे २०२६: पळसे-शिंदे मार्गावरील सर्व्हिस रोडवर सिटीलिंक बसच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. १५) दुपारी घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पळसे येथील बंगाली बाबा दर्ग्याजवळील गायखे मळा परिसरात राहणारे भाऊसाहेब देवकिसन गायखे (वय ४३) हे बुधवारी दुचाकीवरून शिंदे गावाच्या दिशेने जात होते. महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडने प्रवास करत असताना सिन्नरकडून नाशिक रोडच्या दिशेने येणाऱ्या सिटीलिंक बसने (क्र. एमएच १५ जीव्ही ७८६४) अंबिका टेक्सटाईलसमोर त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात गायखे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. याप्रकरणी बसचालकाविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक : ३१६/२०२६)
![]()

