महाराष्ट्र उकाड्याने घामाघूम, पुढील ५ दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट.. जाणून घ्या सविस्तर…

नाशिक। दि. १३ मे २०२६: महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्यात विक्रमी तापमानाचा सामना केल्यानंतर मे महिन्यातही उन्हाचा तडाखा कायम आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागांत पुढील पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात पुढील तीन दिवस ‘हीटवेव्ह’सदृश परिस्थिती राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, तसेच पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

🔎 हे वाचलं का?:  हिट अँड रन: राणेनगर उड्डाणपुलाजवळ कारच्या धडकेत मजूर दाम्पत्याचा मृत्यू

दरम्यान, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या किनारी जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाची नोंद होण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि बीड जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात उद्याही उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांमध्ये सलग तीन दिवस ‘हीटवेव्ह’चा प्रभाव राहू शकतो. विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत पुढील चार दिवस तापमान उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 12 जुलै पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

याशिवाय वर्धा, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांसाठी उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत थेट उन्हात जाणे टाळावे, हलका आहार घ्यावा आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: २८ जून रोजी 'मिशन ग्रीन मान्सून'चा शुभारंभ; लोकसहभागातून हरित नाशिक साकारणार

यलो अलर्ट असलेले जिल्हे:
१३ मे :
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती.
१४ मे : जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा.
१५ मे : छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा.
१६ मे : अकोला व अमरावती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790