नाशिक: आयशरचा निष्काळजी यू-टर्न जीवावर बेतला; कारचालकाचा जागीच मृत्यू

नाशिक। दि. ११ मे २०२६: छत्रपती संभाजीनगर रोडवरील शिलापूर टोलनाका उड्डाणपुलाजवळ मालवाहू आयशर चालकाने निष्काळजीपणे यू-टर्न घेतल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालक दयाराम अरुण पेखळे (वय ३६, रा. माडसांगवी) यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये शीतगृह उभारणीसाठी महानगरपालिकेकडून जागा उपलब्ध करून देणार – मंत्री उदय सामंत

पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. ७ मे) रात्री सुमारे १०:३१ वाजता दयाराम पेखळे हे त्यांच्या स्विफ्ट कारने (एमएच ०४ एफटी ७८८८) छत्रपती संभाजीनगर रोडने प्रवास करत होते. त्याचवेळी ब्रिकेट्सचा माल घेऊन जाणारी आयशर गाडी (एमएच ०३ ईजी ६४१३) चालक भास्कर मुरलीधर जाधव (रा. लाखलगाव, ता. जि. नाशिक) चालवत होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पावसाची दुसऱ्या दिवशीही हुलकावणी, उकाडा वाढला

शिलापूर टोलनाका उड्डाणपुलाच्या पुढे भुजबळ फार्म परिसरात आल्यानंतर आयशर चालकाने अचानक डिव्हायडरजवळ यू-टर्न घेतला. रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून घेतलेल्या या धोकादायक वळणामुळे स्विफ्ट कारची आयशरच्या डाव्या बाजूस जोरदार धडक झाली.

या अपघातात स्विफ्ट कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. दयाराम पेखळे हे गंभीर जखमी होऊन कारमध्ये अडकून पडले होते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रवाशाची ६ लाख रोकड असणारी बॅग लंपास करणारा रिक्षाचालक अटकेत

मृताचे चुलत भाऊ प्रकाश दिलीप पेखळे (वय ४६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी भास्कर जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. (आडगाव पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १८६/२०२६)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790