नाशिक: टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासानाकडून प्रभावी नियोजन

नाशिक। दि. ३० एप्रिल २०२६: जिल्ह्यातील पाणीटंचाई परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनामार्फत सर्वसमावेशक नियोजन करण्यात आले आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध पातळीवर काटेकोर उपाययोजना करण्यात येत आहेत.

नाशिक जिल्ह्यात मोठे 7 व मध्यम 19 प्रकल्प असून या प्रकल्पात आजमितीस 41.61 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. नाशिक शहरासाठी पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण समूहात आजमितीस 54.35 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एफडीएकडून ४८ लाखांचा फ्राइड कांदा आणि तेलाचा साठा जप्त

जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील एकूण 68 गावे व 167 वाड्या, अशा 232 गावे व वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी 75 टँकर सुरू करण्यात आले असून दररोज सरासरी 149 फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण 23 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे 1 लाख 35 हजार 566 नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.

तालुकानिहाय परिस्थिती:
जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांमध्ये विशेषतः चांदवड, येवला, इगतपुरी, मालेगाव, पेठ, सिन्नर आदी तालुक्यांमध्ये पाणीपुरवठा टँकरद्वारे सुरू आहे.
• येवला तालुका : सर्वाधिक 83 वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा, 33 टँकर कार्यरत, 55 फेऱ्या
• मालेगाव तालुका: 37 वस्त्यांमध्ये 10 टँकरद्वारे 19 फेऱ्या
• इगतपुरी तालुका: 42 वस्त्यांमध्ये 14 टँकरद्वारे 30 फेऱ्या
• चांदवड तालुका: 11 वस्त्यांमध्ये 5 टँकरव्दारे 11 फेऱ्या
• पेठ तालुका: 5 वस्त्यांमध्ये 4 टँकर, 8 फेऱ्या
• सिन्नर तालुका: 40 वस्त्यांमध्ये 6 टँकरव्दारे 20 फेऱ्या सुरू आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर रोडवर जाहिरातींना अडसर ठरतात म्हणून ५५ झाडे तोडली; सहा जणांना अटक

नियोजनाची वैशिष्ट्ये:
• प्रत्येक गावासाठी लोकसंख्या व पाण्याची गरज यानुसार टँकरचे नियोजन करण्यात आले आहे.
• टँकरच्या फेऱ्यांची वेळापत्रकनिहाय आखणी करण्यात आली आहे.
• पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करण्यात येते.
• स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत व जलसंपदा विभाग यांच्या समन्वयातून नियोजन.
• टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची तयारी सुरू आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकरची पुरविणे, विहिरींचे पुनर्भरण, तसेच जलसंधारणाच्या उपाययोजनांनाही गती दिली जात आहे.

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, तसेच कोणत्याही अडचणीसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790