नाशिक: उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्ष राहावे- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नाशिक। दि. ३० एप्रिल २०२६: भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी अति उष्णतेचा (Heatwave) इशारा दिला असून, नागरिकांनी उष्णतेबाबत आवश्यक ती खबरदारी घेऊन स्वतःचे व कुटूंबियांचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी कळविले आहे की, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीत अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. या कालावधीत सूर्यप्रकाशाची तीव्रता अधिक असल्याने उष्माघाताचा धोका वाढतो. बाहेर पडणे अपरिहार्य असल्यास डोक्यावर टोपी, स्कार्फ अथवा छत्रीचा वापर करावा, तसेच हलके, सैल व फिकट रंगाचे सूती कपडे परिधान करावेत.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ-२०२७च्या विकासकामांना गती द्या; दर्जाशी तडजोड सहन केली जाणार नाही : मंत्री गिरीश महाजन

उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी नियमित अंतराने पुरेशा प्रमाणात पाणी, ओआरएस इत्यादी द्रवपदार्थांचे सेवन करावे. शरीराचे निर्जलीकरण (डी-हायड्रेशन) टाळण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच आजाराने त्रस्त व्यक्तींनी याबाबत विशेष काळजी घ्यावी.

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये व शासकीय आरोग्य संस्था येथे उष्णतेशी संबंधित आजारांवर उपचारासाठी आवश्यक औषधसाठा, बेड्स व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्जता ठेवण्यात आलेली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: किरकोळ वादातून कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला ७ वर्षांची सक्तमजुरी

नागरिकांना कोणतीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या शासकीय आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. तसेच, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नागरिकांनी पशुधन, पक्षी व प्राण्यांसाठी विविध सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी केले आहे.

बांधकाम, शेती व इतर मैदानी कामांमध्ये कार्यरत कामगारांसाठी संबंधित नियोक्त्यांनी कामाच्या ठिकाणी सावलीची व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, तसेच पुरेशा विश्रांतीची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. कामाचे वेळापत्रक शक्यतो सकाळी व सायंकाळी ठेवण्याचा प्रयत्न करावा. उष्णतेच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून कोणत्याही प्रकारच्या आरोग्य धोक्यापासून स्वतःचे व कुटुंबियांचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790