
नाशिक। दि. ३० एप्रिल २०२६: महावितरण कंपनीकडून करण्यात येणाऱ्या मान्सूनपूर्व दुरुस्ती कामांमुळे शनिवारी (दि. २ मे) सिडको व नाशिक पूर्व भागातील काही प्रभागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
महापालिकेच्या अभियांत्रिकी (पाणीपुरवठा) विभागाने याबाबत नागरिकांना पूर्वसूचना दिली आहे. या कामांसाठी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे मुकणे पंपिंग स्टेशनमधून विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे हा पाणीपुरवठा बंद राहणार असून, तो वेळेत पूर्ववत करण्याचे प्रयत्न राहणार आहेत.
या प्रभागांमध्ये होणार परिणाम:
नवीन नाशिकमधील प्रभाग क्रमांक २२, २४, २५, २६ (भागशः), तसेच २७, २८, २९ व ३१ या संपूर्ण प्रभागांमध्ये दुपारच्या सत्रातील पाणीपुरवठा होणार नाही. नाशिक पूर्व भागातील प्रभाग क्रमांक १४, १५, २३ व ३० (भागशः) येथेही पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी नागरिकांना या परिस्थितीची नोंद घेऊन आवश्यक त्या प्रमाणात पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
![]()

