दूरसंचार आराखडा; कुंभमेळा प्राधिकरणाची प्रमुख दूरसंचार कंपन्यांसोबत बैठक

नाशिक। दि. २१ एप्रिल २०२६: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या प्रचंड गर्दीत अखंडित दूरसंचार सेवा उपलब्ध राहावी यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने मुंबईत दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांसोबत उच्चस्तरीय कार्यशाळा आयोजित केली. या बैठकीत कुंभासाठी व्यापक ‘टेलिकॉम प्रिपेअर्डनेस फ्रेमवर्क’ तयार करण्यावर भर देण्यात आला.

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील या बैठकीस मुख्यमंत्री सल्लागार कौस्तुभ धवसे, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, आयजी राजेश प्रधान, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, डीआयजी (वायरलेस) जी. श्रीधर, एसपी (वायरलेस) राजा रामास्वामी तसेच नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, आणि अतिरिक्त कुंभमेळा आयुक्त कमलाकर रणदिवे उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

या कार्यशाळेत एअरटेल, जिओ, बीएसएनएल, व्होडाफोन आयडिया, टाटा कम्युनिकेशन्स, नोकिया, ह्यूजेस, इंडस टॉवर्स, सी-डॉट, ह्युव्हलेट पॅकार्ड एंटरप्राइज आणि दूरसंचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

कुंभमेळा प्राधिकरणाच्या अंदाजानुसार सिंहस्थ कुंभ २०२७ दरम्यान नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे एकूण १२ कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता असून मुख्य पर्वणी १५ जून ते ३० सप्टेंबर २०२७ दरम्यान होणार आहे. अमृत स्नानाच्या दिवशी सुमारे २.२५ कोटी भाविक एकाच दिवशी उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने दूरसंचार व्यवस्थेवर मोठा ताण येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

यासाठी पाच स्तरांवर आधारित कनेक्टिव्हिटी आराखडा तयार करण्यावर चर्चेत एकमत झाले. यात ५जी तंत्रज्ञान, नेटवर्क स्लाइसिंग व ‘सेल्स ऑन व्हील्स’द्वारे मोबाईल नेटवर्कची क्षमता वाढविणे, प्रशासन व सुरक्षेसाठी स्वतंत्र नेटवर्क, पोलीस व आपत्कालीन सेवांसाठी मिशन-क्रिटिकल कम्युनिकेशन, फायबर व आयपी बॅकहॉलची मजबूत व्यवस्था आणि अंतिम पर्याय म्हणून उपग्रहाधारित कनेक्टिव्हिटीचा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

ही संपूर्ण दूरसंचार यंत्रणा ‘डिजिटल कुंभ’ संकल्पनेला पूरक ठरणार असून एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित गर्दी व्यवस्थापन, ड्रोन सर्वेक्षण आणि बहुभाषिक भाविक सेवा अ‍ॅप यांना यामुळे बळ मिळणार आहे.

या कार्यशाळेतील सूचनांच्या आधारे कुंभमेळा प्राधिकरण लवकरच सविस्तर अंमलबजावणी आराखडा निश्चित करणार असून ३१ ऑक्टोबर २०२६ पासून टप्प्याटप्प्याने कामे सुरू करण्याचे नियोजन आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790