अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा: नाशिक शहर पोलिसांचे आवाहन

नाशिक। दि. १९ एप्रिल २०२६: नाशिक शहरात घडलेल्या एका संवेदनशील घटनेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध अप्रमाणित व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा व अफवांपासून दूर रहावे, असे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  शासकीय कामकाजात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर वाढवावा- अपर मुख्य सचिव विकास खारगे

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून या कारवाईबाबत नागरिक, माध्यमे व विविध घटकांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले आहेत. प्रभावी व नागरिकाभिमुख पोलिसिंगसाठी जनतेचा विश्वास आणि सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

तपास प्रक्रियेदरम्यान संबंधित संस्थांकडून आवश्यक ते सहकार्य मिळत असून प्रकरणाचा तपास पुराव्यांच्या आधारे काटेकोरपणे सुरू आहे. तथापि, काही माध्यमांतून व सोशल मीडियावर अंदाजाधारित (स्पेक्युलेटेड) माहिती प्रसारित होत असल्याने तपासात अडथळे निर्माण होण्याची तसेच समाजात गैरसमज व भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  त्र्यंबकेश्वरमध्ये अतिक्रमणांवर कारवाई सुरू; कुंभमेळ्यापूर्वी दर्शन मार्ग मोकळा करण्यास गती

नागरिक, माध्यम प्रतिनिधी तसेच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कोणतीही माहिती पाहताना व शेअर करताना संयम व जबाबदारी बाळगावी. अप्रमाणित किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करू नये, कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी केवळ अधिकृत माध्यमांद्वारे पुष्टी झालेल्या माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही नाशिक शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790