सांगलीतील सराईत घरफोड्याला नाशिकमध्ये अटक; १५ लाखांचे सोने हस्तगत, १० घरफोड्यांची उकल

नाशिक, दि. ३ एप्रिल २०२६: शहरातील घरफोडीच्या घटनांवर आळा घालण्याच्या दिशेने गुन्हे शाखा युनिट-१ ला मोठे यश मिळाले असून सांगलीतील एका सराईत घरफोड्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गंगापूर रोड परिसरातील ध्रुवनगर येथे करण्यात आली.

प्रदीप जगन्नाथ तुपे (वय ३५, रा. खानापूर, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हवालदार विशाल काठे, प्रशांत मरकड आणि विशाल देवरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल घरफोडी प्रकरणातील संशयित ध्रुवनगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

चौकशीदरम्यान संशयिताने आपली ओळख उघड केली असून पुढील तपासात सातपूर आणि गंगापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण १० घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

तपासात उघड झाले की, संशयित प्रामुख्याने शिवाजीनगर आणि कामगारनगर परिसरात बंद घरांची रेकी करत असे. कामगार वर्गाचे वास्तव्य असलेल्या या भागांमध्ये दिवसा तसेच रात्री घर बंद असल्याची खात्री करून तो लोखंडी रॉडच्या साहाय्याने कुलूप तोडून घरात प्रवेश करत असे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

चोरी केलेल्या सोन्याची विक्री सराफ बाजारातील एका व्यापाऱ्याकडे केल्याचीही कबुली त्याने दिली आहे. पोलिसांनी संबंधित सराफाकडून सुमारे १५ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790