रेल्वे तिकीटांच्या नियमांत महत्वाचे बदल; एप्रिलपासून होणार लागू… जाणून घ्या सविस्तर…

नवी दिल्ली। दि. २५ मार्च २०२६: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी रेल्वे तिकीट रद्द करण्याबाबतच्या नवीन नियमांची घोषणा केली. नवीन नियमांनुसार, रेल्वेगाडी सुटण्याच्या वेळेच्या आठ तास आधीपर्यंत तिकीट रद्द केले, तर शुल्काचा कोणताही परतावा प्रवाशांना मिळणार नाही. आत्तापर्यंत हा कालावधी चार तास होता. १ ते १५ एप्रिलच्या दरम्यान या नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू होईल.

कसे असतील बदललेले नियम?
रद्द तिकिटाच्या परताव्यासंबंधी अन्य स्लॅबमध्येही बदल करण्यात आले आहेत. रेल्वे सुटण्याच्या आठ ते २४ तास आधी तिकीट रद्द केल्यास तिकीट शुल्काच्या ५० टक्के, तर २४ ते ७२ तास आधी तिकीट रद्द केल्यास २५ टक्के रक्कम कापून घेण्यात येईल. रेल्वेच्या वेळेच्या ७२ तास आधी तिकीट रद्द केल्यास प्रत्येक प्रवाशासाठी एक निश्चित शुल्क आकारून संपूर्ण परतावा दिला जाईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

सध्याच्या धोरणानुसार, रेल्वे सुटण्याच्या वेळेच्या चार ते १२ तास आधी तिकीट रद्द केल्यास ५० टक्के, तर ४८ ते १२ तास आधी तिकीट रद्द केल्यास २५ टक्के रक्कम कापून घेतली जाते. गाडीच्या वेळेच्या ४८ तास आधी तिकीट रद्द केल्यास शुल्काचा संपूर्ण परतावा दिला जातो. दलालांकडून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आणि शेवटच्या क्षणी तिकिटांची विक्री रोखण्यासाठी परताव्याच्या नियमात बदल केल्याचे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले. यंदा जानेवारीनंतर सुरू झालेल्या वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत २ गाड्यांसाठी हे नवीन परतावा नियम आधीपासूनच लागू आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

बोर्डिंग पॉइंट बदल अखेरच्या अर्ध्या तासापर्यंत शक्य
तिकीट खिडकीवरून तिकीट खरेदी केलेल्या प्रवाशांना आता प्रवासाच्या ३० मिनिटे आधीपर्यंत प्रवास वर्गाचे श्रेणीवर्धन करता येणार आहे, असे वैष्णव यांनी मंगळवारी सांगितले. यापूर्वी प्रवाशांना रेल्वेचा पहिला चार्ट तयार होण्यापूर्वीच (किमान आठ तास आधी) ही मुभा होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ऑनलाइन तिकीट काढणाऱ्यांना श्रेणीवर्धनाची मुभा नाही. रेल्वेत चढण्याचे ठिकाण बदलण्याची (चेंज बोर्डिंग पॉइंट) मुभाही नियोजित वेळेच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत असेल. सध्या बोर्डिंग पॉइंट बदलण्याची परवानगीही पहिला चार्ट तयार होण्यापूर्वीपर्यंत आहे. या नियमबदलांमुळे शेवटच्या क्षणी प्रवासाच्या नियोजनात बदल करणे प्रवाशांना शक्य होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

दलालांना तिकिटांची साठेबाजी करण्यापासून रोखण्यासाठी तत्काळ बुकिंग प्रणालीत आधार-आधारित ओटीपी, पहिल्या ३० मिनिटांत एजंटांना बुकिंगवर निर्बंध आणि बनावट वापरकर्त्यांना रोखण्यासाठी अँटी-बॉट सोल्युशनचा वापर यांसह विविध बदल करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. आत्तापर्यंत तीन कोटी संशयास्पद युजर आयडी निष्क्रिय करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790