नाशिक: राष्ट्रीय लोकअदालतीत 16 हजार 826 प्रकरणे निघाली निकाली; तब्बल 86 कोटींवर तडजोड शुल्क वसूल

नाशिक। दि. १६ मार्च २०२६: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक यांच्यामार्फत जिल्ह्यात 14 मार्च, 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातून एकूण 16 हजार 826 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे 86 कोटी 94 लाख 89 हजार 133 रूपये तडजोड शुक्ल म्हणून वसूल करण्यात आले आहे. अशी माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सुहास भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

14 मार्च 2026 रोजीच्या राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 55 पॅनलवर प्रलंबित 32 हजार 975 तर दाखल पुर्व 80 हजार 267 इतकी प्रकरणे ठेवण्यात आली होती यापैकी 4 हजार 159 प्रलंबित प्रकरणे तर 12 हजार 667 इतकी दाखल पूर्व प्रकरणे एकाच दिवशी लोक अदालतीच्या माध्यामातून निकाली निघाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत धनुर्विद्या अकादमीच्या खेळाडूंची चमक; दोन रौप्यपदकांची कमाई

राष्ट्रीय लोकअदालतीत या प्रकरणांवर करण्यात आली तडजोड:
मोटार अपघात प्रकरणात तडजोडीने प्रकरणे निकाली-

👉 मोटार अपघात प्रकरणात 9 जानेवारी 2022 मध्ये मोटार सायकल व ट्रक मध्ये झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्या मोटार सायकलस्वाराच्या वारसांना अपघात नुकसान भरपाई प्रकरणात तडजोड होवून रूपये 73 लाख इतकी नुकसान भरपाई मिळाली. मयत संतोष जाधव हे मोटार सायकलीने जात असतांना मिर्ची हॉटेलकडून सूरतकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकच्या धडकेत जबर मार लागून अपघातात मरण पावले. पक्षकारांच्या परस्पर सहमतीने रूपये 73 लाख रकमेत तडजोड होवून प्रकरण लोक अदालतीत निकाली काढण्यात आले. जिल्हाभरात अशी एकूण 273 मोटार वाहन अपघात प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

👉 मोटार अपघात प्रकरणांमध्ये 15 जुलै 2022 रोजी मयत पोलीस कॉन्स्टेबल मधुकर लक्ष्मण खुळे हे मोटार सायकलने सिन्नर कडून पांढुर्ली चौफुलीकडे येत असतांना पिकअप जीपने दिलेल्या धडकीत ते मार लागून मयत झले. या प्रकरणात पक्षकारांच्या परस्पर सहमतीने रूपये 46 लाख 50 हजार रकमेत तडजोड होवून प्रकरण लोक अदालतीत निकाली काढण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेतीत नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासह प्रयोगशीलता आवश्यक- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

👉 मोटार अपघात प्रकरणांत 9 सप्टेंबर 2024 रोजी मोटार सायकल व क्रेनच्या अपघाात सागर संपत कासार हे मयत झाले होते. या प्रकरणातही पक्षकारांच्या सहमतीने रूपये 42 लाख 30 हजार रकमेत तडजोड होवून प्रकरण निकाली निघाले.

👉 निफाड येथे अपघातात मयत झालेले योगेश सुखदेव शिंदे हे राजस्थानमधील जोधपूर येथे सैन्य दलात कार्यरत होते. वारसांनी प्राधिकरणाकडे नुकसान भरपाईसाठी केलेल्या दाव्यात समेट होवून लष्करी जवानाच्या कुटुंबियांना रूपये 1 कोटी 20 लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय होवून प्रकरण निकाली काढण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘डिलिव्हरी कॅन्सल’चा बहाणा करून मोबाईल लंपास करणाऱ्या दोघांना अटक

👉 अक्षय सुपेकर हे 23 जानेवारी 2022 रोजी मोटार सायकलवर बळी मंदीकराकडून राजमाता मंगल कार्यालयाकडे जात असतांना कारने धडक दिल्याने जखमी झाले होते. या अपघातात वाहन मालक व लिबर्टी इन्सुरन्स कंपनी यांच्या विरूद्ध केलेल्या दाव्याचे लोक अदालतीत तडजोड होवून रूपये 94 लाख रूपयांची भरपाई श्री. सुपेकर यांना देण्यात आली.

लोक अदालतीत 40 दांपत्यांचे फुलले संसार:
लोक अदालतीत कौटुंबिक वाद प्रकरणांमध्ये एकूण 3 हजार 173 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी 40 प्रकरणांमध्ये आपसी समझोत्याने वाद मिटून दाम्पत्यांचे वैवाहिक जीवन पूर्ववत झाले.

निकाली निघालेली प्रकरणे दृष्टीक्षेपात:
⚡ परक्राम्य संलेख अधिनियम, कलम 138 अंतर्गतची प्रकरणे – 1141 प्रकरणे
⚡ मोटार अपघात प्रकरणे- 273 प्रकरणे
⚡ कामगार विषयक- 6 प्रकरणे
⚡ कौटुंबिक वादातील प्रकरणे- 40 प्रकरणे
⚡ फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे- 225 प्रकरणे
⚡ इतर – 15141 प्रकरणे

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790