नाशिक: एसटी ‘हिरकणी’ बसला आग; १५ प्रवासी सुखरूप

नाशिक। दि. १४ मार्च २०२६: सोलापूरहून नाशिककडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या ‘हिरकणी’ बसला शुक्रवारी सायंकाळी नाशिक–पुणे महामार्गावरील शिंदेगाव टोल नाक्याजवळ अचानक आग लागल्याची घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व १५ प्रवाशांना वेळेत खाली उतरविण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

एमएच-०६ बीडब्ल्यू १२३५ क्रमांकाची ही बस टोल केबिनजवळ थांबली असताना पुढील भागातील मशीनमधून धूर येऊ लागल्याचे चालक विलास चोले यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी करून वाहक संदीप मोरे व टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बसमधील सहा महिला व नऊ पुरुष प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेबाबत महत्वाची अपडेट…

दरम्यान आगीने वेग घेतल्याने बस पूर्णपणे जळू लागली. टोल नाक्यावर उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन व ड्राय केमिकल पावडर अग्निशमन सिलिंडरच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आग वाढत गेल्याने बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड अग्निशामक केंद्र तसेच सिन्नर-माळेगाव एमआयडीसी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या घटनेदरम्यान परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कार भाड्याने घेऊन परस्पर विक्री; दोन संशयित अंबड गुन्हे शाखेच्या जाळ्यात

प्राथमिक माहितीनुसार, बसच्या पुढील भागातील मशीनजवळ वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दीर्घ प्रवासामुळे गरम झालेले इंजिन व उन्हाचा तडाखा यामुळेही शॉर्टसर्किटची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790