नाशिक: गॅस सिलिंडरसाठी धडपड; पुरेसा साठा असल्याचा प्रशासनाचा दावा…

नाशिक। दि. १२ मार्च २०२६: अमेरिका–इराण संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात निर्माण झालेल्या अनिश्चिततेची झळ आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागली आहे. शहरात एलपीजी व सीएनजी उपलब्धतेबाबत चर्चा सुरू असून त्याचा परिणाम हॉटेल, उपाहारगृहे, केटरिंग व्यवसाय तसेच हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर होत असल्याचे चित्र आहे.

गॅस सिलिंडर मिळणार नसल्याच्या चर्चेमुळे बुधवारी (दि.११) काही गॅस एजन्सीसमोर नागरिकांची मोठी गर्दी झाली. सकाळपासूनच अनेक ग्राहक सिलिंडर मिळविण्यासाठी एजन्सीकडे येऊ लागले. ऑनलाइन बुकिंगसाठी वारंवार प्रयत्न करूनही नंबर लागत नसल्याच्या तक्रारींमुळे अनेकांनी थेट एजन्सीकडे धाव घेतली. परिणामी काही ठिकाणी ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंगही घडले. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने एका एजन्सीचे कार्यालय काही काळ बंद ठेवावे लागले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये संततधार पाऊस, गंगापूर धरणातून ३,०९९ क्यूसेक विसर्ग

दरम्यान, शहरातील काही सीएनजी पंपांवरही वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. गॅस उपलब्धतेबाबत अनिश्चिततेची चर्चा सुरू असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्धतेवर निर्बंध असल्याने हॉटेल व्यावसायिक, केटरर्स आणि मेसचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हातगाडीवर ताजे खाद्यपदार्थ तयार करून विकणाऱ्या लहान व्यावसायिकांची परिस्थिती आणखी कठीण झाली असून काहींना व्यवसाय तात्पुरता बंद ठेवावा लागत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘अमृत’ मार्फत 'पराक्रम दिना' निमित्त १ ते १५ ऑगस्टदरम्यान राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन

तथापि, जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दर तीन दिवसांनी नव्याने सिलिंडरचा साठा उपलब्ध होत असल्याने सध्या टंचाईची परिस्थिती नसल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने सांगितले. मागणी अचानक वाढल्यामुळे वितरणात काही अडचणी येत असल्याचेही प्रशासनाने नमूद केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: APK फाईल डाऊनलोड करताच व्यावसायिकाची १.६९ लाखांची ऑनलाइन फसवणूक

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता नियमित पद्धतीने ऑनलाइन बुकिंग करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. सिलिंडरचा काळाबाजार आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर दोन तर प्रत्येक तालुक्यात एक तपासणी पथक नियुक्त करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790