नाशिक: प्रवाशाची जबरी लूट करणाऱ्या रिक्षाचालकासह तिघांना अटक !

नाशिक। दि. ७ मार्च २०२६: रिक्षाने प्रवास करणाऱ्या मजुराला इच्छित स्थळी न नेता निर्जन ठिकाणी नेऊन चाकूचा धाक दाखवत मोबाइल व रोकड लुटणाऱ्या रिक्षाचालकासह तिघांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी निलगिरी बाग परिसरात राहणारे कामगार प्रदीप धोडाई कुमार यांनी आडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. बुधवारी (दि. ४) दुपारी ते रिक्षाने निलगिरी बागेकडे जात असताना रिक्षाचालक व त्याच्या दोन साथीदारांनी त्यांना छत्रपती संभाजीनगर मार्गावरील रुद्रा फार्मजवळील मोकळ्या जागेत नेले. तेथे हात पिळून शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाइल फोन व रोकड असा सुमारे ३८ हजार रुपयांचा ऐवज जबरीने लुटल्याची घटना घडली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुढील ३ ते ५ दिवसांत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता

घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान नांदूर स्मशानभूमी परिसरात काही संशयित फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक विकास पंचमुख व त्यांच्या पथकाने सापळा रचून प्रशांत अशोक भारसाखळे, निवृत्ती ऊर्फ सोनू राजू जाधव आणि विजय भगवान मोरे या तिघांना ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ प्राध्यापकांची भरती

चौकशीदरम्यान तिघांनी जबरी लूट केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून लुटलेला मोबाइल, रोकड तसेच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा (एमएच १५ एके ५६३१) असा सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790