नाशिक। दि.२मार्च २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील विकासकामांमुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व खाजगी ट्रॅव्हल्स बस थांबे, पिक-अप व ड्रॉप पॉईंट्स तसेच पार्किंग स्थळे यांचे स्थलांतर ‘तपोवन सिटीलिंक बस टर्मिनल’ येथे करण्यात आले असून या संदर्भातील अधिसूचनेला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
यापूर्वी एक महिन्यासाठी निर्गमित केलेल्या अधिसूचनेत सुधारणा करून १ मार्च २०२६ ते ३१ मे २०२६ या कालावधीत निर्बंध लागू राहणार आहेत. आवश्यकतेनुसार पुढील मुदतवाढ देण्याचे अधिकार प्रशासनाने राखून ठेवले आहेत.
🛣️ शहरात विकासकामांचा वेग:
सध्या द्वारका सर्कल येथे भुयारी मार्गाचे (अंडरपास) काम सुरू असून हा चौक शहरातील वाहतुकीचा प्रमुख केंद्रबिंदू मानला जातो. याशिवाय शहरातील सुमारे ३० रस्त्यांचे विकास, रुंदीकरण, दुरुस्ती कामे तसेच चार उड्डाणपुलांचे बांधकाम आणि ड्रेनेज, पाइपलाइनसह इतर पायाभूत सुविधा प्रकल्प नाशिक महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर द्वारका सर्कल, मुंबईनाका सर्कल, रुची हॉटेल परिसर महामार्ग, ठक्कर बाजार, ट्रॅक्टर हाऊस, तिग्रानिया रोड, कन्नमवार पूल या भागांत वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच वाहतुकीची सुरक्षितता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
🚫 सकाळी ८ ते रात्री १० ‘नो एन्ट्री’:
पोलीस उपायुक्त किरीथिका सी.एम. यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, शहरात सकाळी ८.०० ते रात्री १०.०० या कालावधीत सर्व प्रकारची जड व अवजड वाहने तसेच खाजगी प्रवासी बसेसना प्रवेशबंदी राहील. ही वाहने रात्री १०.०० नंतर ते सकाळी ८.०० पूर्वीच शहरात प्रवेश करू शकतील.
🚌 तपोवन टर्मिनलवरूनच प्रवासी चढ-उतार बंधनकारक:
शहरातील सर्व खाजगी प्रवासी ट्रॅव्हल बस थांबे, पिक-अप, ड्रॉप पॉईंट्स व पार्किंग स्थळे रद्द करण्यात आली असून सर्व बसेसना ‘तपोवन सिटीलिंक बस टर्मिनल’ येथूनच प्रवाशांची चढ-उतार व थांबा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
🚨 उल्लंघन केल्यास कठोर कारवाई:
या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक व बस मालकांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ११९/१७७, १२२/१७७, २०७ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
नागरिक, खाजगी बस मालक व चालकांनी या आदेशाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.
![]()

