नाशिक: आरटीओच्या नावाने बनावट अ‍ॅप पाठवून १० लाखांचा गंडा

नाशिक | दि. २५ फेब्रुवारी २०२६: आरटीओच्या नावाने बनावट चालान पाठवून मोबाइलवर एपीके फाइल इन्स्टॉल करण्यास भाग पाडत सायबर भामट्याने सुमारे १० लाख २९ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

पीडित व्यक्ती ४० वर्षीय व्यावसायिक असून, विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी आरोपीने आरटीओ अथवा ट्रॅफिक पोलिसांच्या नावाने बनावट चालान पाठवले. संबंधित फाइल डाऊनलोड केल्यानंतर तक्रारदार व साक्षीदार यांच्या मोबाइलचा दूरस्थ (रिमोट) अॅक्सेस आरोपीने मिळवला.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ते २४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आरोपीने तक्रारदारांच्या संमतीशिवाय त्यांच्या बँक खात्यातून एकूण १०,२९,४३९ रुपये ऑनलाईन व्यवहारांद्वारे काढून घेतले. फसवणूक लक्षात येताच पीडितांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

एपीके फाइल म्हणजे काय?:
व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमांद्वारे ‘आरटीओ एपीके’ नावाची बनावट अॅप्लिकेशन फाइल पाठवली जाते. ही फाइल इन्स्टॉल केल्यास संबंधित व्यक्तीच्या मोबाइलवरील नियंत्रण हॅकर्सकडे जाते. त्यानंतर वैयक्तिक माहिती, बँक तपशील आणि ओटीपीचा गैरवापर करून आर्थिक व्यवहार केले जातात. एपीके (APK) हे अँड्रॉइड प्रणालीवर अॅप्स इन्स्टॉल करण्यासाठी वापरले जाणारे फाइल स्वरूप आहे.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

सायबर पोलिसांनी नागरिकांना अनोळखी लिंक किंवा एपीके फाइल डाऊनलोड न करण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद संदेश आल्यास तत्काळ सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790