पोलीस असल्याची बतावणी करून लुटणाऱ्या दोघांना अटक; ५८ गुन्हे उघड व ३० लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत

नाशिक। दि. २४ फेब्रुवारी २०२६: अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने धाडसी कारवाई करत पोलीस असल्याचे भासवून नागरिकांना लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना ३० किलोमीटर पाठलाग करून ओझर उड्डाणपुलावर अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे ५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

२२ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हेशोध पथक नियमित गस्त घालत असताना पोलीस अंमलदार मयूर पवार यांनी पाथर्डी फाटा परिसरात मोटारसायकलवर फिरणारे दोन संशयित इसम पाहिले. संशय बळावल्याने त्यांनी तत्काळ पाठलाग सुरू केला आणि याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांना माहिती दिली.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

वरिष्ठ निरीक्षक राजपूत यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच संशयितांनी मुंबई-आग्रा महामार्गाने पळ काढला. सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, अंमलदार: मयूर पवार, उल्हास गांगुर्डे, समाधान शिंदे, संदीप भुरे, सागर जाधव आणि सचिन करंजे यांनी सुमारे ३० किमी पाठलाग करून ओझर येथील उड्डाणपुलावर दोघांना घेरले. अटक करताना आरोपींनी झटापट करून पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.

तपासात आरोपींनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलीस असल्याचे भासवून लूट केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या ताब्यातून सुमारे ५ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

अटक आरोपींची नावे: अमजद अली अकबर अली बेग (वय ४७, रा. भिवंडी, जि. ठाणे) आणि फैयाज इम्तियाज अन्सारी (वय २८, रा. भिवंडी, जि. ठाणे) अशी आहेत. दोघेही पोलीस असल्याची बतावणी करून चोरी करण्यात सराईत असून २०२३ पासून आतापर्यंत त्यांच्यावर एकूण ५८ गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यापैकी नाशिक शहरातील ४२, नाशिक ग्रामीणमधील १०, धुळे शहरातील ५ आणि कर्नाटक राज्यातील १ गुन्ह्याचा समावेश आहे.

आतापर्यंत १० गुन्ह्यांतील सुमारे २०१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत ३० लाख रुपये) जप्त करण्यात आले आहेत. तसेच २९ जून २०२४ रोजी कर्नाटकातील गडग जिल्ह्यातील बेटगेरी पोलीस ठाण्यात पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याच्या गुन्ह्यातही हे आरोपी वाँटेड असल्याची माहिती समोर आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

विशेष म्हणजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मयूर पवार यांनी सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून आरोपींची हालचाल, वाहन, कपडे, हेल्मेट आणि देहबोलीचा सखोल अभ्यास केला. त्यातूनच आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, आरोपींच्या इतर साथीदारांची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790