नाशिक। दि. २४ फेब्रुवारी २०२६: शहरातील वाहतूक शिस्त अधिक काटेकोर करण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक ‘डिजिटल पोलिस’ प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली असून, त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत शहरातील ४० हून अधिक सिग्नल चौकांवर रेड लाइट व्हायोलेशन डिटेक्शन (RLVD) आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (ANPR) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
या प्रणालीद्वारे सिग्नल तोडणाऱ्या तसेच इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर थेट ई-चलनाची कारवाई सुरू झाली आहे. सोमवारी (दि. २३) एकाच दिवशी ७५ वाहनचालकांना ई-चलन पाठविण्यात आले. मागील चार दिवसांत एकूण ३०५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
ई-चलन मोहिमेला शुक्रवार (दि. २०) पासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी २० वाहनचालकांना त्यांच्या मोबाइलवर ई-चलन पाठवण्यात आले. त्यानंतर शनिवारी १५०, रविवारी ६० आणि सोमवारी ७५ अशा टप्प्याटप्प्याने कारवाईचा आकडा वाढत गेला आहे.
दरम्यान, काही वाहनचालकांनी मोबाइलवर ई-चलन प्राप्त होताच पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून दंड भरल्याची माहिती दिली. डिजिटल यंत्रणेमुळे नियमभंग करणाऱ्यांवर तत्काळ आणि पारदर्शक कारवाई होत असल्याने वाहतूक शिस्त सुधारण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
![]()

