नाशिकमध्ये आजपासून दोन दिवस पावसाची शक्यता

नाशिक। दि. २२ फेब्रुवारी २०२६: बंगालच्या खाडी परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर जाणवू लागला असून रविवारपासून पुढील तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार २२ व २३ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्रात, तर २३ व २४ फेब्रुवारीला विदर्भात पावसाचे सावट राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

नाशिक जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून आकाश ढगाळ आहे. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असल्याने पावसाची शक्यता बागायतदारांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. अवकाळी पाऊस झाल्यास द्राक्षांच्या मण्यांना तडे जाऊन उत्पादनाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर लाखो रुपयांच्या तोट्याचे संकट ओढवू शकते.

दरम्यान, लाल कांद्याची आवक बाजारात वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढून साठवणुकीस ठेवला असताना दमट हवामानामुळे कांदा खराब होण्याचा वेग वाढला आहे. परिणामी बाजारभावातही घसरण झाल्याचे चित्र आहे. ढगाळ वातावरणाचा परिणाम आरोग्यावरही दिसून येत असून दम्याच्या रुग्णांना त्रास वाढल्याने वैद्यकीय दवाखान्यांत रुग्णसंख्या वाढत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

देवळा तालुक्यातील पश्चिम भागात शुक्रवारी (दि. २०) उशिरा रात्री झालेल्या अवकाळी पावसाने उन्हाळ कांदा, डोंगळे, भुईमूग, हरभरा तसेच कापणीस आलेल्या गव्हाच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

पुणे येथील हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, दक्षिण-पश्चिम बंगालच्या खाडीत व विषुववृत्तीय हिंदी महासागर परिसरात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातून खालच्या स्तरावर उत्तर-पूर्वेकडून बाष्पयुक्त चक्रीय वारे वाहत आहेत. हे वारे जमिनीवरील कोरड्या हवेशी संयोग पावल्यानंतर राज्यातील वातावरणात बदल होऊन ढगाळ स्थिती निर्माण झाली आहे. एकूणच, अवकाळीच्या या शक्यतेमुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790