नाशिक। दि. १८ फेब्रुवारी २०२६: शहरातील चेतना नगर परिसरात मेफॅड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी साठा करून ठेवलेल्या तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली असून त्याच्याकडून सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली की, संशयित वैभव पांडुरंग आव्हाड (वय २५, रा. राधाकृष्ण अपार्टमेंट, हॉटेल साई पॅलेसजवळील रोड, चेतना नगर, नाशिक) हा आपल्या राहत्या घरी मेफॅड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने ठेवून असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली.
मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हे यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांना आवश्यक सूचना देऊन कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने आरोपीच्या राहत्या घरी सापळा रचला. यावेळी पोलीस श्वान पथकात नव्याने दाखल झालेल्या ‘जॅक’ या श्वानाच्या मदतीने घराची तपासणी करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपीच्या घरातून एकूण ७ ग्रॅम वजनाचा एमडी (मेफॅड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. या अंमली पदार्थाची किंमत सुमारे ३५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच इतर २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण ६० हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास इंदिरानगर पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
![]()

