नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील विविध वाहतूक मार्गात बदल

नाशिक। दि. १८ फेब्रुवारी २०२६: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने गुरुवारी (दि.१९) शहरातील नाशिकरोड, पंचवटी, पाथर्डी फाटा या उपनगरांमध्ये मिरवणुका काढण्यात येणार आहेत. यानिमित्ताने शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. वाहतूक नियंत्रण शाखेकडून याबाबत अधिसूचना मंगळवारी (दि.१७) जारी केली आहे.

नाशिकरोडला या मार्गांवर प्रवेशबंदी (सकाळी ९:०० पासून):
बिटको चौक, सिन्नरफाटा, रेल्वेस्थानक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे उड्डाणपुलाखालील रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना मज्जाव.
जेलरोडकडे, बिटको चौकाकडून जेलरोडकडे जाणारा रस्ता आणि नांदुरनाक्याकडून बिटकोकडे येणारा रस्ता.

पर्यायी मार्ग असा:
नाशिकरोड बस स्थानक, रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी दत्त मंदिर सिग्नल येथून सुराणा चौक, आनंदनगरी टी-पॉइंट, सत्कार टी-पॉइंट या मार्गे ये-जा करतील. स्थानकाकडून सीबीएसकडे जाणाऱ्या बसेस नाशिकरोड जुन्या कोर्टासमोरून सरळ आर्टिलरी सेंटररोडने जयभवानी चौकातून पुढे उपनगर सिग्नलकडे मार्गस्थ होतील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण वृत्तीचा स्वीकार करावा- पोलिस महासंचालक सदानंद दाते

पुण्याकडून नाशिककडे येणाऱ्या व जाणाऱ्या बसेस तसेच सर्व जड-अवजडवाहने दत्तमंदिर सिग्नल येथून उड्डाणपुलाचा वापर करून पुढे मार्गस्थ होतील. नांदुरनाक्याकडे जाणारी वाहने इंगळे नगर कॅनॉलरोडने नारायणबापूनगरमार्गे टाकळी एसटीपीसमोरून पुढे जातील. नांदुरनाका चौकाकडून बिटको चौकाकडे येणारी वाहतूक दसक पुलावरून एकेरी करण्यात येणार आहे.

पंचवटीत वाहतुकीत बदल:
पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड या भागात विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. बुधवारी (दि.१८) दुपारी तीन वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत आणि गुरुवारी (दि.१९) सकाळी १० ते रात्री मिरवणूक संपेपर्यंत पंचवटीतील वाहतूक मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तुमच्या दुकानात बालकामगार काम करतोय? होऊ शकते कठोर कारवाई !

आरास-देखावे: या मार्गावर प्रवेश बंद (दु.३ ते रात्री १२ वाजेपर्यंत):
मालेगाव स्टॅण्ड-इंद्रकुंड-पंचवटी कारंजा-दिंडोरी नाका पर्यंत ये-जा करणाऱ्या वाहनांना मज्जाव.
मखमलाबाद नाका-चिंचबनकडून मालेगाव स्टॅण्डकडे येणाऱ्या वाहतुकीला प्रवेश बंद.

मिरवणूक- या मार्गावर प्रवेश बंद (सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत):
दिंडोरी नाका ते मालेगाव स्टॅण्ड रस्ता.
गोदापार्क कॉर्नर ते रामवाडी पुलापर्यंत येणारा रस्ता
मखमलाबाद नाका ते मालेगाव स्टॅण्डपर्यंत दुतर्फा वाहतुकीला मनाई.

पर्यायी मार्ग असा:
पेठनाका-मखमलाबाद नाका-रामवाडीमार्गे पुढे हनुमानवाडी लिंकरोडने जुना गंगापूर नाक्याकडे वाहने मार्गस्थ होतील. तसेच बुधवारी (दि.१८) पेठनाका-मखमलाबाद नाका- रामवाडी पुलावरून पुढे चोपडा लॉन्स, ड्रीम कॅसल सिग्नलकडे वाहतूक वळविण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुढील ३ ते ५ दिवसांत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता

इंदिरानगर, पाथर्डी फाटा येथे मिरवणुका:
या भागातील वाहतूकमार्गातसुद्धा शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून बदल करण्यात आला आहे. दुपारी ३ वाजेपसून रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीवरील निबंध कायम राहणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.

प्रवेश बंद:
गरवारे टी-पॉइंट ते पाथर्डीफाटापर्यंत ये-जा करणाऱ्या सर्व वाहनांना मनाई.
पाथर्डी गाव ते पाथर्डीफाट्यापर्यंतचा रस्ता तसेच पुढे अंबड, सातपूर एमआयडीसीकडे जाणारा रस्ता.

पर्यायी रस्ता असा:
‘लोकमत’ रॅम्प येथून उड्डाणपुलाचा वापर वाहनचालकांनी करावा. तसेच आश्विननगर, इंदिरानगर डाउन रॅम्प वाहतुकीसाठी खुला राहणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790