नाशिक: KOTA IIT अकॅडमीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; वर्षभर पसार असलेले आरोपी राजस्थानातून ताब्यात

नाशिक। दि. १७ फेब्रुवारी २०२६: ‘KOTA IIT अकॅडमी’ कोचिंग क्लासच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या पालकांकडून व गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांची फसवणूक करून तब्बल एक वर्षापासून फरार असलेल्या उच्चशिक्षित आयटी तज्ञांना नाशिक पोलिसांनी राजस्थानमधून ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखा अंबड आणि गंगापूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत ही उल्लेखनीय कामगिरी पार पडली.

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दि. ४ जानेवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी २०१७ पासून ‘KOTA IIT अकॅडमी’ या नावाने क्लासेस चालवत विद्यार्थ्यांचा व पालकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या फीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर रक्कम स्वीकारली. काही जणांना क्लासमध्ये भागीदार करून घेण्याचे, तसेच नवीन शाखा सुरू करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडूनही पैसे उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

फसवणुकीतून मिळालेल्या रकमेतून आरोपींनी नाशिक शहरात जंगम मालमत्ता खरेदी केली होती. मात्र गुन्हा उघडकीस आल्यानंतर ती मालमत्ता विकून आरोपी कुटुंबासह फरार झाले होते. आरोपी हे आयटी क्षेत्रातील तज्ञ असल्याने त्यांनी मागे कोणताही धागादोरा राहू नये याची काळजी घेतली होती. बँक व्यवहार, पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच सीडीआरची माहिती तपासूनही सुरुवातीला पोलिसांना ठोस माहिती मिळत नव्हती. त्यामुळे आरोपी जवळपास एक वर्ष पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान, तांत्रिक विश्लेषण विभागाच्या महिला सहायक पोलीस निरीक्षक जया तारडे यांच्या मदतीने आरोपी राजस्थानातील भीलवाडा येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. तसेच तेथे नव्याने कोचिंग क्लास सुरू केल्याचेही उघड झाले. त्यानुसार गुन्हे शाखा अंबडचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, श्रीराम पाटील (गंगापूर पोलीस ठाणे) आणि त्यांच्या पथकाने भीलवाडा येथे जाऊन शोधमोहीम राबवली.

तपासादरम्यान आरोपींनी बिकानेर शहरातही अशाच प्रकारे क्लासच्या नावाखाली फसवणूक केल्याचे समोर आले. त्यांच्या विरोधात बिकानेर व गंगाशहर (राजस्थान) येथे एन.आय. ॲक्ट कलम १३८ अंतर्गत २०१७ पासून प्रलंबित स्थायी वॉरंट असल्याचे आढळले. संबंधित प्रकरणांत राजस्थान पोलिसांनाही ते हवे होते.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

स्थानिक पोलिसांच्या मदतीने १) सुरेंद्र मानसिंग भोजावत (वय ४३), २) जयसिंग मानसिंग भोजावत (वय ४५), ३) उमा कवर सुरेंद्र सिंग भोजावत (वय ४१), ४) दीपा जयसिंग भोजावत (वय ४३), ५) नवरतन मानसिंग भोजावत (वय ६६) आणि ६) मानसिंग छोंगसिंग भोजावत (वय ७८, सर्व रा. चंद्रशेखर आझाद नगर, जैन मंदिर रोड, भीलवाडा, राजस्थान) यांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, फसवणुकीतून झालेल्या आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790