सिंहस्थ कुंभमेळा: पाणी, स्वच्छता व स्वच्छतागृह व्यवस्थापनासाठी तांत्रिक सल्लागार समितीची स्थापना

नाशिक। दि. ७ फेब्रुवारी २०२६: नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीला वेग आला असून, या पार्श्वभूमीवर नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने पाणी, स्वच्छता व स्वच्छतागृह व्यवस्थापनासंदर्भात तज्ज्ञ मार्गदर्शन मिळावे, यासाठी तांत्रिक सल्लागार समिती स्थापन केली आहे. कुंभमेळ्यासारख्या भव्य धार्मिक सोहळ्यात स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीकाठी कोट्यवधी भाविक येण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षित पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, पुरेशी स्वच्छतागृह सुविधा, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन तसेच स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण, गोदावरी नदीचे संवर्धन आणि भाविकांना सुरक्षित अनुभव देणे शक्य होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

नवीन स्थापन करण्यात आलेली तांत्रिक सल्लागार समिती सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या नियोजन, अंमलबजावणी तसेच पूर्व व पश्चात टप्प्यांमध्ये मार्गदर्शन व तांत्रिक सल्ला देणारी सल्लागार संस्था म्हणून कार्य करणार आहे. कुंभमेळा क्षेत्रातील घाट, मंदिर परिसर, तात्पुरते निवास कॅम्प आणि जास्त गर्दीच्या ठिकाणांसाठी तयार करण्यात येणाऱ्या स्वच्छता मास्टर प्लॅनचे परीक्षण व मान्यता देण्याचे काम ही समिती करणार आहे. तसेच स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सांडपाणी वाहिन्या, प्रक्रिया केंद्रे तसेच घन व द्रव कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक तांत्रिक बाबींवर समिती मार्गदर्शन करणार आहे.

या समितीत वॉश इन्स्टिट्यूट, वर्ल्ड बँक, युनिसेफ महाराष्ट्र, टाटा ट्रस्ट्स आणि आयआयटी मुंबई या प्रमुख संस्थांमधील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला असून, सांडपाणी व्यवस्थापन, शहरी स्वच्छता, हवामान अनुकूलता, कचरा व्यवस्थापन तसेच पाणीपुरवठा व मलनिस्सारण व्यवस्थापन या क्षेत्रातील त्यांचे अनुभव आणि कौशल्याचा लाभ कुंभमेळा प्राधिकरणाला मिळणार आहे. ही समिती कंपोस्टिंग युनिट्स, बायोडायजेस्टर, विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया प्रणाली आणि शून्य कचरा संकल्पना यांसारख्या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर सुचविणार आहे. तसेच डिजिटल साधने आणि डॅशबोर्डच्या माध्यमातून स्वच्छता व्यवस्थेचे रिअल-टाइम निरीक्षण करण्यासाठीही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

यासोबतच स्वच्छ व हरित कुंभमेळा संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी भाविक, मंदिर ट्रस्ट आणि नागरिक यांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती, माहिती, शिक्षण व संवाद उपक्रम तसेच सामाजिक माध्यमांवरील प्रसार याबाबतही समिती मार्गदर्शन करणार आहे.

WASH तांत्रिक सल्लागार समितीच्या प्रमुख जबाबदाऱ्या:
👉 सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी पाणी, स्वच्छता व स्वच्छतागृह व्यवस्थेच्या नियोजन व अंमलबजावणीस मार्गदर्शन
👉 घाट, मंदिर परिसर, कॅम्प आणि गर्दीच्या ठिकाणांसाठी स्वच्छता व WASH मास्टर प्लॅनचे परीक्षण व मान्यता
👉 स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि सांडपाणी व्यवस्थेसाठी तांत्रिक निकष सुचविणे
👉 घन व द्रव कचरा प्रक्रिया व सुरक्षित विल्हेवाटीसाठी शाश्वत तंत्रज्ञानाची शिफारस
👉 कंपोस्टिंग, बायोडायजेस्टर व विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया यांसारख्या पर्यावरणपूरक उपाययोजना प्रोत्साहित करणे
👉 डिजिटल साधनांद्वारे स्वच्छता व्यवस्थेचे रिअल-टाइम निरीक्षण सक्षम करणे
👉 स्वच्छ व हरित कुंभमेळ्यासाठी जनजागृती व सहभागात्मक उपक्रमांना मार्गदर्शन

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या धार्मिक सोहळ्यांसाठी स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनाचे नवे मानदंड निर्माण करण्याची संधी आहे. तांत्रिक सल्लागार समितीच्या माध्यमातून कुंभमेळ्यातील WASH प्रणाली शास्त्रीय पद्धतीने, पर्यावरणपूरक आणि भव्य प्रमाणावर राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण, गोदावरी नदीचे संवर्धन आणि प्रत्येक भाविकाला स्वच्छ व सुरक्षित अनुभव देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. – शेखर सिंह, आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790