सीबीएसजवळ घटना; एक संशयित पोलिसांच्या ताब्यात
नाशिक। दि. ८ जानेवारी २०२६: आर्थिक वादातून जुन्या आग्रा रोडवरील सीबीएस परिसरात असलेल्या आशिष बंगल्याला आग लावण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली. या आगीत बंगल्याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन दुचाकी व एक कार पूर्णतः जळून खाक झाली. प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी चेतन गुणवंतराव पाटील (रा. महात्मा नगर) याला अटक केली आहे.
या संदर्भात रुची सुराणा यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. तक्रारीनुसार, संशयित चेतन पाटील याच्यासोबत सुराणा यांच्या पतीने यापूर्वी आर्थिक व्यवहार पूर्ण केले होते.
कोणतेही देणे बाकी नसताना पाटील याने राज पवार नावाच्या व्यक्तीमार्फत १ कोटी ८० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. ही रक्कम न दिल्यास घरासमोर येऊन अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याची तसेच बंगला पेटवण्याची धमकी देण्यात आली होती.
सुराणा कुटुंबाने पैशांची मागणी फेटाळल्यानंतर संशयिताने मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पेट्रोल टाकून बंगला पेटवण्याचा प्रयत्न केला. या आगीत पार्किंगमधील दोन दुचाकी आणि कार जळून नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या बंबाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या प्रकरणाचा पुढील तपास सरकारवाडा पोलीस करीत आहेत. (सरकारवाडा पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ०६/२०२६)
![]()

