
नाशिक। दि. ३० डिसेंबर २०२५: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात येणाऱ्या नाशिक परिक्रमा मार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक यांनी पुढाकार घेऊन भूसंपादन प्रक्रियेला चालना द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
नाशिक परिक्रमा मार्गाच्या भूसंपादनाबाबत संबंधित क्षेत्रातील तलाठी आणि ग्रामसेवक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे (दिंडोरी), तहसीलदार मुकेश कांबळे (दिंडोरी), अपर तहसीलदार अमोल निकम (नाशिक शहर) यांचेसह मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, नाशिक परिक्रमा मार्गामुळे सर्वच क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यातून नाशिक शहराच्या विकासाचे भक्कम वर्तुळ तयार होणार आहे. त्यामुळे तलाठी, ग्रामसेवकांनी आपापल्या भूसंपादन अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून भूसंपादनाच्या कार्यवाहीला गती द्यावी.
तलाठी, ग्रामसेवकांनी प्रत्यक्ष मोजणी प्रक्रियेत सहभाग नोंदवताना जमिनीचा मूळ मालक कोण आहे याची ओळख पटवावी, थेट खरेदीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा शासन नियमानुसार अधिकाधिक मोबदल्याचा लाभ मिळणार असल्याचे शेतक-यांना समजून सांगावे, विरोध केल्याने भाव वाढवून मिळत नाहीत तर समन्वयातून लवकरात लवकर लाभ देणे शक्य व्हावे, यासाठी सहकार्याची भूमिका घेण्याचे आवाहन करावे. सातबारा उताऱ्यावरील मृत व्यक्तीचे नाव बदलण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करावी, पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींनी ग्राम सभेचे ठराव करून घ्यावेत आदी सुचना त्यांनी बैठकीत केल्या.
![]()

