नाशिक, १३ नोव्हेंबर २०२५: राज्यात हवामान कोरडे झाल्याने आणि उत्तरेकडून प्रति तास १० ते १२ किलोमीटर वेगाने थंड वारे वाहत असल्यामुळे आगामी तीन दिवस नाशिक, जळगाव आणि यवतमाळ जिल्ह्यांत थंडीची लाट तीव्र होण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड, ओझर, मालेगाव, रुई, धानोरे आणि धारणगाव परिसरात थंडीची तीव्रता अधिक जाणवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गुरुवारी (१३ नोव्हेंबर) नाशिक शहरात किमान तापमान १०.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले, तर निफाडमध्ये तापमान ९.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले.
पश्चिमी विक्षोभाच्या परिणामामुळे उत्तर भारतात हिमवृष्टी झाली असून लेह-लडाखमध्ये बर्फाची चादर पसरली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या झोकामुळे पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशातही थंडीची लाट पसरली आहे. आता विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातही थंडी वाढू लागली असून पुढील तीन दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दिवसाही थंडगार वारे वाहत असल्याने गारवा जाणवत आहे. रात्री आठनंतर रस्त्यांवरील वर्दळ लक्षणीयरीत्या कमी झाल्याचेही चित्र दिसून येत आहे. नागरिकांना या वाढत्या थंडीचा विशेषत: सकाळी व रात्री सामना करावा लागू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
![]()


