वैभव देवरे याच्यावर पुन्हा सावकारी छळाचा सहावा गुन्हा दाखल
नाशिक (प्रतिनिधी): सराईत सावकार संशयित वैभव यादवराव देवरे (३९, रा. चेतनानगर) हा पोलिसांच्या तावडीत आला असला तरी त्याच्यावर आणखी एक बेकायदेशीर सावकारी व छळाचा गुन्हा इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर दाखल गुन्ह्यांची संख्या आता एकूण सात झाली आहे. पेठेनगर येथील एका हॉटेल व्यावसायिकाशी ओळख करून घेत त्याला व्याजाने चार लाखांचे कर्ज देऊन नऊ लाख रुपये उकळले. त्यानंतर जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेल भाडेततत्वावर चालविणारे फिर्यादी सचिन विलास बरडे (३९, रा. पेठेनगर कॉर्नर) यांच्या हॉटेलमध्ये वैभव देवरे हा कधी कुटुंबासोबत तर कधी मित्रांना घेऊन जेवणासाठी जात होता. तेथे बरडे यांच्यासोबत त्याची ओळख झाली. या ओळखीतून २०२२साली देवरे याने दुपारच्या सुमारास हॉटेलवर त्यांना चार लाखाचे कर्ज देत व्याजाचे त्वरित ४० हजार रुपये काढून घेतले होते. दरमहा देवरे व त्यांचा शालक निखिल नामदेव पवार (३०) याला फोन पे द्वारे व्याजाचे पैसे देत होते एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२२सालापर्यंत व्याजाचे दोन लाख रुपये दिले होते.
त्यानंतर आर्थिक अडचण आल्याने चार सप्टेंबर २०२२ साली देवरे यांच्याकडून एक लाख रुपये बरडे यांनी पुन्हा घेतले. त्यानंतर देवरे व पवार यांना प्रत्येक महिन्याला ५० हजार रुपये देत होते. ऑक्टोबर २०२२ सालापासून आतापर्यंत त्यांनी ऑनलाइन ८ लाख ५० हजार रुपये दिले आहेत. एकूण नऊ लाख रुपये व्याज दिले होते. त्यानंतर बरडे यांची आर्थिक परिस्थिती खराब झाल्याने देवरे यांना व्याज देऊ शकले नाही.
कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी:
प्रत्यक्षात चार लाख ५० हजार रुपये घेतले असताना मुद्दल व्याज व दंड अशी एकूण १४ लाख रुपये घेऊन मूळ मुद्दल बाकी आहे असे सांगून संपूर्ण आर्थिक व्यवहार मिटवायचा असेल तर २५ लाख रुपये द्यावे लागतील अशी बेकायदेशीररीत्या खंडणीची मागणी केली. खंडणीची रक्कम दिली नाही तर तुला व तुझ्या परिवारातील कुटुंबीयांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असे बरडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.