नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या लोगो स्पर्धेला देश-विदेशातून उत्स्फूर्त प्रतिसाद; ३ हजारांहून अधिक नोंदी प्राप्त

नाशिक। दि. ९ फेब्रुवारी २०२६: नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी आयोजित लोगो डिझाईन स्पर्धेला देशासह विदेशातूनही मोठा प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेत ३ हजारांहून अधिक नोंदी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सुमारे ७० नोंदी आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्राप्त झाल्या असून देशातील २५ पेक्षा अधिक राज्यांमधील विद्यार्थी, डिझायनर आणि सर्जनशील क्षेत्रातील व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मान्सूनपूर्व कामांना महावितरणची सुरुवात; देखभाल व दुरुस्तीसाठी बंद करावा लागतोय वीजपुरवठा

सिंहस्थ कुंभमेळ्याची आध्यात्मिक परंपरा, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व, तसेच गोदावरी नदीचे पावित्र्य आणि श्रद्धा, शुद्धता व आध्यात्मिक नवचैतन्य या मूल्यांचे प्रभावी प्रतिबिंब उमटेल असा अधिकृत लोगो विकसित करण्याच्या उद्देशाने कुंभमेळा प्राधिकरणामार्फत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा दि. २० नोव्हेंबर २०२५ ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात उष्णतेची लाट तीव्र; अकोला सर्वाधिक ४३.१ तर नाशिक ३९.५ अंश सेल्सिअस

स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या नोंदींची छाननी आणि मूल्यांकन प्रक्रिया सध्या सुरू आहे. वास्तुकला, सांस्कृतिक अभ्यास, दृश्यकला आणि ललितकला या क्षेत्रांतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील आठ तज्ज्ञांच्या परीक्षक मंडळामार्फत नोंदींचे परीक्षण केले जात आहे. सर्जनशीलता, विषयाशी सुसंगतता, सादरीकरणाची गुणवत्ता आणि एकूण दृश्य परिणाम या निकषांवर नोंदींचे परीक्षण केले जात आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत देश-विदेशात वाढत असलेली उत्सुकता आणि जागतिक स्तरावर मिळणारी ओळख या स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादातून स्पष्ट होत असल्याचे कुंभमेळा प्राधिकरणाने नमूद केले आहे. परीक्षक मंडळाच्या मूल्यांकनानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे नाशिक येथे 16 एप्रिल रोजी आयोजन

निवड करण्यात येणारा लोगो हा नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ चा अधिकृत दृश्य प्रतीक म्हणून वापरण्यात येणार असून, कुंभमेळा प्राधिकरणाच्या सर्व अधिकृत पत्रव्यवहार, दिशादर्शक फलक, जनजागृती मोहिमा आणि प्रचार साहित्यामध्ये त्याचा वापर करण्यात येणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790