नाशिक (प्रतिनिधी): भारत सरकारच्या कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील विपणन आणि निरीक्षण संचालनालयाच्या नाशिक रोड उप कार्यालयात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. २) लाचखोर वरिष्ठ विपणन अधिकारी संशयित विशाल तळवडकर यास रंगेहाथ जाळ्यात घेतले. तळवडकरसह अन्य काही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील एका डेअरी उत्पादन कंपनीकडून सीबीआय एसीबीच्या मुंबई कार्यालयात तक्रार करण्यात आली होती. या कंपनीच्या बँडसाठी (अॅगमार्क) परवाना हवा होता. यासाठी तलवाडकर यांच्या विपणन आणि निरीक्षण कार्यालयाकडे तक्रारदाराने खूप अगोदरपासून अर्ज केलेला होता. याबाबत त्यांच्याकडून कार्यालयाकडे सतत पाठपुरावा केला जात होता. सर्व कायदेशीर प्रक्रिया व कागदपत्रांची पूर्तता करूनदेखील प्रमाणपत्र मिळाले नाही.
हे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात येथील अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत सीबीआयच्या एसीबी शाखेला प्राप्त तक्रार अर्जानुसार चौकशी केल्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये तथ्य आढळून आल्यानंतर पथकाने सोमवारी नाशिक रोड येथील उप कार्यालयात सापळा रचला. या ठिकाणी तळवडकर हे तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची लाचेची मागणी करीत ती रक्कम येथील कार्यालयात स्वीकारताना रंगेहाथ जाळ्यात अडकले. त्यांनी ही रक्कम स्वतः करिता व कार्यालयातील अन्य काही कनिष्ठ वर्गातील अधिकाऱ्यांकरिता घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सीबीआयकडून तलवाडकर व अन्य काही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणी अधिक तपास सीबीआयचे मुंबई पथक करीत आहे.
संशयितांची घरझडती: मुख्य संशयित तलवाडकर याच्यासह आणखी काही संशयित आरोपींची घरझडती रात्री उशिरापर्यंत सीबीआय-एसीबीच्या पथकाकडून घेतली जात होती. त्यांच्या निवासस्थानांसह कार्यालयांमध्ये झाडाझडती घेत तपासणी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. लाचखोर अधिकाऱ्यांना मंगळवारी (दि. ३) सीबीआयच्या विशेष न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.