नाशिक (प्रतिनिधी): सीबीएस-त्र्यंबकनाका स्मार्टरोडवर पदपथावर किरकोळ कारणावरून दोघा फिरस्त्यांमध्ये रविवारी (दि.१) दुपारी हाणामारीची घटना घडली. यावेळी एका अल्पवयीन फिरस्त्याने ४० वर्षीय अनोळखी फिरस्त्याचे डोके पेव्हर ब्लॉकने फोडून गंभीररीत्या जखमी केले. जखमीला शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीत एचआरडी सेंटरसमोरील पदपथावर दुपारी तीन वाजेच्या सुमारास दोन फिरस्ते आपापसांत भिडले. यावेळी एका अनोळखी फिरस्त्याने अल्पवयीन फिरस्त्या मुलाला शिवीगाळ केली. या कारणावरून त्याने मनात राग धरत त्याच्या डोक्यात सिमेंटचे पेव्हर ब्लॉक उचलून दोन ते तीनवेळा मारले.
यामुळे तो गंभीररीत्या जखमी होऊन खाली कोसळून बेशुद्ध पडला. घटनेची माहिती तेथे उपस्थित रिक्षाचालकांनी डायल-११२वर दिली. त्वरित सरकारवाडा पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखा युनिट-१चे पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमीला तपासून बघितले असता त्याचा श्वासोच्छवास सुरू होता.
त्यामुळे पोलिसांनी त्वरित त्याला वाहनात टाकून शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट- १च्या पोलिस पथकाने एका १५ वर्षीय अल्पवयीन फिरस्त्या मुलाला ताब्यात घेतले आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
रिक्षाचालकांनी हल्लेखोराला पकडले:
जेव्हा दोन फिरस्त्यांमध्ये हाणामारी झाली तेव्हा तेथे काही रिक्षाचालक नेहमीप्रमाणे प्रवाशांच्या प्रतीक्षेसाठी उभे होते. जेव्हा डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून अल्पवयीन फिरस्ता पळवून जाऊ लागला, तेव्हा रिक्षाचालकांनी समयसूचकता दाखवून त्यास पकडले आणि रिक्षामध्ये बसविले. पोलिस येताच रिक्षाचालकांनी अल्पवयीन मुलाला त्यांच्या हवाली केले. रिक्षाचालकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे गंभीर जखमीला त्वरित उपचार मिळाले व त्याच्यावर हल्ला करणारा विधिसंघर्षित बालकदेखील पोलिसांना सापडला.