नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीतील अमृतधाम चौफुली येथे भरधाव वेगातील टँकरच्या धडकेत स्कुटीस्वार महिला ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर, दिंडोरी रोडवरील तारवालानगर सिग्नल येथे भरधाव वेगातील कारच्या धडकेत पादचारी महिला ठार झाल्याची घटना घडली. या दोन्ही अपघातप्रकरणी वाहनचालकांविरोधात मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
अश्विनी पंडित शेजवळ (२३, रा. एरिगेशन कॉलनी, मखमलाबाद रोड) असे मयत महिलेचे नाव आहे. पोलीस हवालदार गणेश सुरेश माळवाळ यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शनिवारी (ता. १७) दुपारी एक वाजेच्या सुमारास अश्विनी शेजवळ या अमृतधाम चौफुलीवरून जात असताना, त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या टँकरने जोरदार धडक दिली.
या अपघातामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या अश्विनी शेजवळ यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात टँकर चालक राजाराम भगीरथ सिंग (५८, रा. तुळसीपुरा, मुरैना, मध्यप्रदेश) याच्याविरोधात मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिला सहायक पोलीस निरीक्षक गावित या तपास करीत आहेत.
तसेच, दिंडोरी रोडवरील तारवाला सिग्नल येथे भरधाव वेगातील कारच्या धडकेत पादचारी महिला ठार झाली. गेल्या शुक्रवारी (ता. १६) दुपारी साडेतीनच्या सुमारास दिंडोरी रोडवरील तारवाला नगर सिग्नलकडे ज्योती शंकर वाघ (४५, रा. कालिकानगर, पंचवटी) या पायी जात होत्या.
त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील कारने त्यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात त्या गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांच्या मृत्यु झाला. याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरोधात पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.