नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मंगल कार्यालयामध्ये गर्दीचा फायदा घेऊन मौल्यवान वस्तूंसह फोटोग्राफरचे महागड्या कॅमेरे व साहित्य चोरणाऱ्या चोरट्याला रंगेहाथ पकडले आहे.
नागरिकांनी त्यास चोप देत आडगाव पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांच्या चौकशीतून आडगावसह म्हसरुळ पोलिसात दाखल गुन्ह्यांची उकल झाली असून, त्याच्याकडून दुचाकीसह चोरलेले तीन कॅमेरे व साहित्य असा ५ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रोहित पुंडलिक झगडे (२१, रा. भोये गल्ली, सिन्नर) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. तेजस विठ्ठलराव शिंदे (रा. शिवाजीनगर, पालखेड रोड, ता. दिंडोरी) यांच्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित रोहित झगडे हा गेया २ फेब्रुवारी राजेी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर रोडवरील समृद्धी बॅक्वेंट हॉल येथे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आला होता त्यावेळी त्याने हॉलमध्ये असलेल्या विवाह सोहळ्यामुळे गर्दी असताना, त्याचा गैरफायदा घेत संशयिताने कॅनॉन कंपनीच्या कॅमेऱ्याची लेन्स, बॅग, मेमरी कार्ड, बॅटरी, चार्जर, ट्रिगर, लेन्स कॅप, सेल चार्जर असे सुमारे १ लाख ७७ हजार ५०० रुपयांचे साहित्य चोरून नेले होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुभाष चव्हाण, अशोक पाथरे, सुरेश नरवडे, देवराम सुरंजे, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, गणेश देसले, दिनेश गुंबाडे आदींनी कामगिरी केली.
सीसीटीव्हीमुळे पकडला:
दरम्यान, चोरीच्या घटनेला दहा दिवस झाल्यानंतर संशयित रोहित पुन्हा समृद्धी बॅक्वेंट हॉल येथे आला होता. २ तारखेच्या चोरीच्या वेळी संशयित रोहित याने काळ्या रंगाचे जॅकेट, तोंडावर मास्क लावला होता.
ही छबी मंगल कार्यालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली होती. दोन दिवसांपूर्वी विवाहसोहळ्याप्रसंगी संशयित रोहित पुन्हा आला आणि त्याच वेशभूषेत आल्याने व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तोच असल्याचे लक्षात आले.
त्यामुळे त्यास हेरून पकडले आणि चोप दिला. त्याने चोरीची कबुली दिल्यानंतर त्यास आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सिन्नरमध्ये फोटो स्टुडिओ:
संशयित रोहित झगडे याचा सिन्नर येथे स्वत:चा फोटो स्टुडिओ आहे. १२ वी झाल्यानंतर रोहित याने फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेतले. मोठ्या भावाने त्यास स्टुडिओ टाकून ते नवीन कॅमेराही घेऊन दिला होता. परंतु त्याने नाशिकला येत म्हसरुळ व आडगाव हद्दीतील मंगल कार्यालयांमध्ये जाऊन लग्नांमध्ये तीन महागडे कॅमेरे चोरल्याच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्याच्या स्टुडिओतून हे कॅमेरे जप्त केले आहेत.