नाशिक (प्रतिनिधी): महापालिका बांधकाम विभाग आता सिटी सेंटर मॉलते गोविंदनगरकडे जाणाऱ्या मार्गावर छोटा उड्डाणपूल उभारण्याच्या तयारीत आहे. जेणेकरुन उंटवाडीकडून सिडकोकडे येणारी जाणारी वाहने विनाअडथळा उड्डाणपुलाखालून तर सिटी सेंटर मॉलकडून गोविंदनगरकडे जाणारी येणारे वाहने उड्डाणपुलावरून मार्गक्रमण करतील.
आगामी सिंहस्थापूर्वीच तो उभारण्याचा मनपाचा प्रयत्न असणार आहे. शहराचा चौफेर विकास होत असताना वाहनांची संख्या वाढत असल्याने ठिकठिकाणी ट्रॅफिक जॅमच्या स्पॉटमध्ये भर पडत आहे. द्वारका सर्कल, मुंबईनाका सर्कलसह आता सिटी सेंटर मॉलचौकातही वाहतूक कोंडीची मोठी समस्या उद्भवली आहे. मागील पाच वर्षात हा परिसर झपाट्याने विकसित झाला आहे.
विशेषत: सिटी सेंटर मॉलपासून गोविंदनगरकडे जाणारा रस्ताच्या आजूबाजूचा परिसरात व्यावसायिक संकुले, बँका व मोठी कार्यालये, रुग्णालये यासह रहिवासी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे दिवसा व सायंकाळी येथे वाहनांचा लांबच लांब रांगा पहायला मिळतात.
या ठिकाणी सिग्नल असला तरी असून खोंळबा नसून अडचणअशी परिस्थिती असते. अनेकदा या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसही नेमावा लागतो. परंतु आता यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी महापालिका बांधकाम विभाग सिटी सेंटर मॉलचौक ते गोविंदनगरकडे जाणाऱ्या नंदिनी नंदी पुलापर्यंत छोटा उड्डाणपूल उभारणार आहे.
जेणेकरून दोन्ही बाजूंना ये-जा करणाऱ्यांना वाहनांना सिग्नलच्या कटकटीपासून सुटका होणार असून थेट उड्डाणपुलावरून मार्गक्रमण करता येईल. तर सिडकोकडून उंटवाडीकडे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना उड्डाणपुलाखालून विनासिग्नल अडथळा प्रवास करता येईल. बांधकाम विभागाकडून येथील वाहतुकीचे सर्वेक्षण सुरू असून लवकरच उड्डाणपुलाचे इस्टिमेट तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. विशेष: सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन सुरू आहे.