नाशिक: सुट्टीवर आलेल्या जवानाचे अपघाती निधन

नाशिक (प्रतिनिधी): निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील भारतीय सैन्य दलातील जवान योगेश सुकदेव शिंदे यांचे काल शुक्रवार (दि.१५) रोजी सायंकाळी अपघाती निधन झाले आहे…

जवान योगेश शिंदे हे गावी सुटीवर आले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जवान योगेश शिंदे यांनी भारतीय सैन्यामध्ये भरती होऊन कुटुंबासोबत देशाची सेवा केली. मात्र, काल अचानक अपघातामध्ये त्यांचे दुर्दैवी निधन झाल्याने शिंदे कुटुंबावर आणि गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: मित्रांसोबत गावतळ्यात पोहायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने मुलाचा बुडून करुण अंत

याबाबत अधिक माहिती अशी की, जवान योगेश शिंदे हे पोळ्याच्या सणानिमित सुट्टीवर आले होते. यावेळी त्यांनी कुटुंबासोबत पोळ्याचा सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार (दि.१५) रोजी ते काही कामानिमित्त मोटारसायकल वरून वनसगाव रस्त्यावरून जात असताना समोरून येणाऱ्या पीकअप गाडी व त्यांच्या मोटारसायकलची जोरदार धडक झाली.

यात जवान योगेश शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, या अपघातानंतर रात्री त्यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी देवळाली कॅम्प येथील आर्मी सेंटर येथे पाठविण्यात आला होता. तसेच आज शनिवार (दि.१६) रोजी जवान योगेश शिंदे यांच्यावर खडक माळेगाव येथे आणल्यानंतर चार वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. योगेश शिंदे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, भावजई असा परिवार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: हायवेला ढाब्यांवर दारू रिचविणाऱ्यांची आता काही खैर नाही !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790