नाशिक (प्रतिनिधी): पेन्शनची रक्कम काढून मोबाईलसह ती पिशवीत ठेवली आणि पायीच घराकडे परतत असताना, ती पिशवी बळजबरीने खेचून पोबारा करणार्या संशयिताला अंबड पोलिसांनी अवघ्या तासाभरात जेरबंद केले.
संशयित महाविद्यालयीन युवक असून, मौजमजा करण्यासाठी त्याने जबरी चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे.
खुशाल शरदचंद्र मोरे (१९, रा. सावतानगर, सिडको) असे संशयित युवकाचे नाव आहे. ७८ वर्षीय सेवानिवृत्त रंगनाथ बाबुराव माळवे (रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) हे गेल्या मंगळवारी (ता. २७) पाटीलनगर येथील पोस्ट ऑफिसमध्ये आले होते.
पेन्शनची रक्कम काढली आणि ३० हजाराची रक्कम त्यांनी त्यांच्याकडील पिवळ्या रंगाच्या पिशवीत मोबाईलसह ठेवली. त्यानंतर ते पुन्हा पायीच घराकडे निघाले.
त्यावेळी बुलेट दुचाकीवरून आलेल्या संशयित मोरे याने त्यांच्या हातातील पिशवी बळजबरीने खेचून पोबारा केला. याप्रकरणी अंबड पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हेशोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक वसंत खतेले यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात तपास केला असता त्यात संशयित बुलेटस्वार निष्पन्न झाला.
पोलीस अंमलदार सागर जाधव याने संशयित मोरेची ओळख पटवून त्यास पथकासह सापळा रचून अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्याच्याकडून रोकड ३० हजार व मोबाईल असा ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सदरची कामगिरी सहायक निरीक्षक वसंत खतेले, किरण गायकवाड, संदीप भुरे, अनिल ढेरंगे, घनश्याम भोये, राकेश राऊत यांनी बजावली.
मौजमजेसाठी केली जबरी चोरी:
संशयित खुशाल मोरे हा महाविद्यालयीन शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे. केवळ मौजमजा करण्यासाठी त्याने जबरी चोरी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात तो फसला. त्याची घरची परिस्थितीही चांगली असून, केवळ मौजमजेच्या हव्यासापायी तो गुन्हेगार झाला आहे.