शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश

नाशिक (प्रतिनिधी): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश आले आहे. प्रभाग क्रमांक २४ मधील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पोलीस विभागाच्या सूचनेनुसार स्मार्ट सिटीच्या पथकाने याबाबत पाहणी केली आहे. या दोन्ही विभागांचे आभार मानण्यात आले आहेत.
गोविंदनगर, कर्मयोगीनगर, जुने सिडकोसह संपूर्ण प्रभाग २४ मध्ये सोनसाखळी चोरी, घरफोडीसह वाढत चाललेल्या गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी, गुन्हेगारांचा शोध घेण्यास मदत व्हावी यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात यावे, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने पोलीस आयुक्त आणि स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे निवेदनाद्वारे १८ एप्रिल २०२२ आणि ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यात आली होती.

तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, जयंत नाईकनवरे, स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्या वेळोवेळी भेटी घेण्यात आल्या होत्या. सततच्या पाठपुराव्यानंतर अंबड आणि मुंबई नाका पोलिसांनी सर्व्हे करून सीसीटीव्हीची आवश्यकता असल्याचा अहवाल पोलीस आयुक्तांना दिला. तत्कालीन पोलीस आयुक्त नाईकनवरे यांच्या सूचनेनुसार सीसीटीव्ही बसविण्याची कार्यवाही करण्याचे पत्र शहर वाहतूक विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी स्मार्ट सिटीच्या मुख्याधिकार्यांना दि. ८ नोव्हेंबर २०२२ रोजी दिले होते. या पत्रांच्या प्रती या दोन्ही विभागांनी बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांनाही दिल्या आहेत. सततच्या पाठपुराव्यानंतर स्मार्ट सिटीकडून कार्यवाही सुरू झाली आहे. सिटी सेंटर मॉल सिग्नल, आर डी सर्कल, महाराणाप्रताप चौक या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत, ते लवकरच कार्यान्वित होतील.
येथे केली पाहणी:
स्मार्ट सिटीच्या पथकाने सोमवारी, १५ मे २०२३ रोजी प्रभाग क्रमांक २४ मध्ये पाहणी केली. दोंदे पुलाजवळ तिडकेनगर येथे, जगतापनगर येथे मातोश्री चौक, कालिका पार्क उद्यान, कर्मयोगीनगर येथे ब्लू बेल्स पूलाजवळ, खोडे मळा, मंगलमूर्तीनगर चौक, छत्रपती राजे संभाजी महाराज व्यायामशाळा, रणभूमी क्रिकेट टर्फजवळील तिडके चौक, गोविंदनगर सर्व्हिस रोडजवळील चौक, जिजामाता उद्यान, सत्यम स्वीट्स चौक, लेखानगर, जुने सिडको आदी ठिकाणी या पथकाने पाहणी केली. यावेळी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे आदींसह रहिवाशी हजर होते.