नाशिक: पंचवटीतील खूनप्रकरणी चौघांना जन्मठेप

नाशिक (प्रतिनिधी): जुन्या भांडणाची कुरापत काढून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याला ठार केल्याप्रकरणी कोर्टाने चौघा तरुणांना जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास आणखी सहा महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.

याबाबत माहिती अशी, की पंचवटीतील पेठ रोडवरील नवनाथनगर येथे किरण राहुल निकम या तरुणाबरोबर चार-पाच महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून सहा जणांनी निकम याच्यावर सशस्त्र हल्‍ला केला होता. गेल्या सन 2017 मध्ये दि. 189 मे रोजी झालेल्या या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे राहुल निकमचे निधन झाले होते.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: रेल्वे तिकीट आरक्षणाच्या नियमात मोठा बदल; फक्त इतके दिवस आधी करता येणार बुकिंग

या प्रकरणी त्याचा मावसभाऊ नितीन दिनकर पगारे (वय 35, रा. म्हसरूळ राजवाडा) यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. यावरून पोलिसांनी आरोपी गणेश अशोक उघडे (वय 30), जितेश ऊर्फ बंडू संतोष मुर्तडक (वय 37), संतोष विजय पगारे (वय 36), सागर विठ्ठल जाधव (वय 32), संतोष अशोक उघडे (वय 32) व जयेश ऊर्फ जया हिरामण दिवे (वय 35, सर्व रा. फुलेनगर, दिंडोरी रोड, पंचवटी) यांच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 302, 143, 147, 148 अन्वये गुन्हा नोंदविला होता. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक के. डी. वाघ यांनी या प्रकरणी तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी होऊन जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 5 येथील न्या. व्ही. पी. देसाई यांनी आरोपी गणेश उघडे, जितेश ऊर्फ बंडू मुर्तडक, संतोष पगारे आणि संतोष अशोक उघडे या चौघांना भा. दं. वि. कलम 302, 120 (ब) व 149 अन्वये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: ऑनर किलिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टात आरोपीला २० वर्षे कारावास

या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्‍ता डॉ. सुधीर कोतवाल यांनी काम पाहिले. गुन्हा शाबित होण्याच्या दृष्टीने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तपासी अंमलदार, पैरवी अधिकारी आणि कोर्ट अंमलदार यांचे पोलीस आयुक्‍त अंकुश शिंदे आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: आदर्श आचार संहिता कालावधीत 'हे' निर्बंध राहतील लागू !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790